Mon, Aug 03, 2020 14:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जाळ्यांच्या नुकसानीपोटी मच्छिमारांना 25 हजार रुपयांचे अनुदान

जाळ्यांच्या नुकसानीपोटी मच्छिमारांना 25 हजार रुपयांचे अनुदान

Last Updated: Dec 07 2019 7:52PM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

समुद्रात मासेमारी करत असताना बर्‍याचवेळा संरक्षित दुर्मिळ प्रजाती मच्छिमारांच्या जाळ्यात अडकतात. हे जाळे तातडीने कापले, तरच संबंधित प्राणी वाचू शकतात. जाळे कापल्यामुळे मच्छिमारांना मोठे नुकसान सहन करावे लागते. मच्छिमारांचे हे नुकसान भरून निघावे आणि दुर्मिळ प्रजातींच्या जतन आणि संवर्धनात वेग यावा यासाठी राज्याच्या वन विभागाने मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या सहकार्याने अशा घटना झाल्यास 25 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मच्छिमारांना ही नुकसानभरपाई प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, वन विभाग यांच्यामार्फत अटी व शर्तीच्या अधीन राहून दिली जाणार आहे, असे माहिती जनसंपर्क विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मासेमारी करतांना जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ सागरी प्राण्यांना जाळे कापून समुद्रात सोडल्यास होणार्‍या नुकसानीची भरपाई म्हणून 25 हजार रुपयांचे अनुदान वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत दिले जाते. आतापावेतो 22 प्रकरणांमध्ये 4 लाख 36 हजार 750 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली त्यापैकी 10 जणांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे तर उर्वरित 12 जणांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने जर मासेमारी करतांना दुर्मिळ सागरी प्राणी जाळ्यात अडकले तर त्यांना जाळे फाडून समुद्रात सोडण्याचे व फाडलेल्या जाळ्यापोटी 25 हजार रुपयांचे अनुदान मिळवण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

वन विभागाने मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने सागरतटीय जिल्ह्यात मच्छिमारांचे प्रशिक्षण घेतले आहे. महाराष्ट्र समुद्र किनारपट्टीजवळ लेदर बॅक कासव आढळल्याची शेवटची नोंद 1995 साली करण्यात आली होती. काही प्रमाणात ही प्रजाती अंदमान बेटावर आढळते. कांदळवन प्रतिष्ठानच्या सुरु असलेल्या या जनजागृतीमुळे मच्छिमार अशी कासवे जाळ्यात अडकले तर ते पुन्हा समुद्रात सोडून देत असल्याचे कांदळवन कक्षाचे निरिक्षण आहे.

राज्याच्या 720 कि.मी लांबीच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. आययुसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) यांनी विविध प्राण्यांना धोकादायक प्रजातींच्या लाल यादीत समाविष्ट करून समुद्री प्राण्यांच्या संवर्धन स्थितीचे मूल्यांकन केले आहे.  यामध्ये समुद्री सस्तन प्राणी (डॉल्फिन, व्हेल), शार्क मासे, सागरी कासव आदींना वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या परिशिष्ट 1 अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे.

कासव आणि प्रजातींना मिळाले जीवदान

मागील सहा महिन्यात पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदूर्ग जिल्ह्यातून दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये 13 ओलीव रिडले कासव, 5 ग्रीन सी कासव, 4 व्हेल शार्क (देव मुखी/बहिरी) या प्रजातींना जीवदान मिळाले आहे. काही महिन्यांपूर्वीच श्रीवर्धन येथील भरडखोल येथे एका मच्छिमाराच्या जाळ्यात लेदरबॅक समुद्री कासव सापडले होते, त्यांनी जाळे कापून या कासवाची सुटका केली आणि त्याला सुखरूप समुद्रात सोडून दिले. मच्छिमारांनी या योजनेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.