Sun, Sep 27, 2020 02:44



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सा. बां. विभागाकडून 22 हजार 118 खोल्या 

सा. बां. विभागाकडून 22 हजार 118 खोल्या 

Last Updated: Mar 25 2020 9:14PM




मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाविरुद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22 हजार 118 खोल्यांची सज्जता करण्यात आली असून, या ठिकाणी 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

ते म्हणाले की, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील 22 हजार 118 खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वस्तीगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधादेखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपत्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापरदेखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी हवे त्यावेळी उपलब्ध असतील, असेही चव्हाण म्हणाले.





 







"