Mon, Jan 18, 2021 09:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात २१५०, मुंबईत १३६३ नवे रुग्ण

ठाण्यात २१५०, मुंबईत १३६३ नवे रुग्ण

Last Updated: Jul 13 2020 1:35AM
मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात दुसर्‍या क्रमांकाचे कोरोना रुग्ण असलेल्या ठाणे जिल्ह्यात रविवारी 2 हजार 150 नवे रुग्ण सापडले असून तब्बल 54 रुग्णांचे कोरोनाने बळी घेतले आहेत. ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 55 हजार 304  वर गेली असून मृतांचा आकडा 1 हजार 616 झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे कल्याण-डोंबिवलीत विक्रमी 661 नवे रुग्ण सापडले असून आठ रुग्ण दगावले आहेत. ठाण्यात 417 नवे रुग्ण आणि 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात 31 हजार 70 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत शनिवारी कोरोना रुग्णांमध्ये 1263ने वाढ झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 92 हजार 720 वर पोहोचला आहे. 44 जणांचा मृत्यू झाला असून 1441 जण बरे होऊन घरी परतले आहेत.  गेल्या चोवीस तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक 28,637 रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे. तर 500 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्‍त केली जात आहे. 

राज्यात रविवारी कोरोनाच्या 7 हजार 827 नवे रुग्ण आढळले. सध्या राज्यात 1 लाख 3 हजार 516 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी 3 हजार 340 रुग्णांना घरी सोडले. आतापर्यंत एकूण 1 लाख 40 हजार 325 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 17 हजार 895 नमुन्यांपैकी 2 लाख 54 हजार 427 नमुने पॉझिटिव्ह (19.3 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 86 हजार 150 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 47 हजार 801 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

घोडबंदर रोड, नौपाडा, कळवा, उथळसरमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक वाढल्याने ठाणे पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रविवारी पुन्हा 417 नवे रुग्ण सापडले असून  9 रुग्ण दगावले आहेत. आता ठाण्यातील मृतांचा आकडा 508 वर गेला असून  कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 342 झाली आहे. आतापर्यंत 7 हजार 129 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंब्रा परिसरातील कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश आले आहे. आज सहा रुग्ण सापडले असून आठवडाभरापासून संख्या लक्षणीय घटली आहे.  

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर काही कमी होत नाही. रुग्ण संख्येचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. शनिवारी 615 रुग्णानंतर रविवारी 661 नवे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 8 रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 189 झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजार 813 झाली आहे. 

मीरा-भाईंदर क्षेत्रात 119 रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 5 हजार 568 झाली आहे. सात रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 191 वर गेली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 134 नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांचा आकडा 3 हजार 87 झाली आहे. पाच रुग्ण दगावल्याने एकूण मृत्यू 87 झाले आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात 79 रुग्णांची भर पडली असून दोन रुग्ण दगावले आहेत.  दोन हजार 782 रुग्ण झालेल्या भिवंडीत 146 रुग्ण दगावले.  

उल्हासनगरमध्ये पुन्हा 286 रुग्ण सापडले. एकूण रुग्ण 4 हजार 200 झाले आहेत. चार रुग्णांचा  मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 67 वर गेली आहे. अंबरनाथ विक्रमी 100 रुग्ण सापडले असून आठ रुग्ण दगावले आहेत. 2 हजार 674 रुग्ण झालेल्या अंबरनाथमध्ये मृतांचा आकडा 105 झाला आहे. बदलापूरात 41 नव्या रुग्णांमुळे  कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 393 वर गेली आहे.