होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदिवलीत होणार १९०० कोटींचे बॉलीवूड थीम पार्क

कांदिवलीत होणार १९०० कोटींचे बॉलीवूड थीम पार्क

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 1:38AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईतील कांदिवली व रायगड जिल्ह्यातील रोहा आणि अलिबाग येथे नवे पर्यटन प्रकल्प उभे राहत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीसोबतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्यामुळे निसर्गसौंदर्याची उधळण असलेल्या कोकणात आता पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.

राज्याचे पर्यटन सचिव विजयकुमार म्हणाले, मुंबईतील कांदिवली येथील महिंद्र अँड महिंद्र कंपनीच्या मालकीच्या 21 एकर जागेत बॉलीवुड थीम पार्क उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी स्विमिंग पूल, भव्य स्टुडिओ, फिल्म स्कूल, फिल्म म्युझियम, अ‍ॅम्फी थिएटर उभारले जाईल. सुमारे 1900 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार्‍या या प्रकल्पातून 900 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा समुद्रकिनारी यशोबाला प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटन विकास करण्यात येणार आहे. सुमारे 165 एकर जागेवर 822 कोटी रुपयांची गुंतवणूक करून पर्यटन प्रकल्प उभारण्यात येतो आहे. या प्रकल्पांतर्गत इको टुरिझम, अ‍ॅडव्हेंचर ट्रॅक, क्राफ्ट व्हिलेज, हॉस्पिटॅलिटी सेंटर, पॅथर सफारी, क्लब हाऊस प्रोजेक्ट अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून सुमारे एक हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा विजयकुमार यांनी केला आहे.

अलिबाग येथे हयात कंपनीच्या वतीने रिसॉर्ट उभारण्यात येणार आहे. या रिसॉर्टच्या माध्यमातून पर्यटकांसाठी स्विमिंग पूल, 250 अलिशान रूम, तसेच स्पोर्टसच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 24 एकर जागेवर उभारण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. 

या माध्यमातून 450 लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे प्रकल्प उभारणार्‍या कंपन्यांना जीएसटींतून सूट तसेच अन्य काही सवलती देण्याविषयी सरकारचा विचार सुरू असल्याचेही विजयकुमार यांनी सांगितले.