होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : जिल्ह्यात १७ केंद्रांसाठी १७ हजार ३०० शिवभोजन थाळींना मंजूरी

रायगड : जिल्ह्यात १७ केंद्रांसाठी १७ हजार ३०० शिवभोजन थाळींना मंजूरी

Last Updated: Apr 13 2020 2:20PM
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांवर येणार नाही उपासमारीची वेळ

अलिबाग (रायगड) : पुढारी ऑनलाईन 

राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त शिवभोजन केंद्रातून शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात तसेच राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे परराज्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अनेक कामगार, मजूर हे रायगड जिल्हयातील पनवेल, खोपोली, खालापूर, उरण, कर्जत, पेण, अलिबाग इत्यादी भागात अडकून पडलेले आहेत. रोजगाराअभावी या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्रासाठी वाढीव शिवभोजन थाळींना मंजूरी देण्यात आली आहे. 

वाचा  - तारापूर एमआयडीसीतील गॅलेक्सी कंपनीत स्फोट; दोन कामगार ठार

त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे - 

पनवेल (महानगरपालिका क्षेत्र) मंजूर थाळींची संख्या ३ हजार १५०, पनवेल (ग्रामीण क्षेत्र) २ हजार, अलिबाग शहर-१ हजार ५०, अलिबाग (ग्रामीण)- ४००, पेण-१ हजार १००, मुरूड-४००, उरण-२ हजार १००, रोहा-१ हजार १००, सुधागड-४७५, कर्जत-४००, खालापूर-२ हजार १००, महाड-६००, माणगाव-६००, पोलादपूर-४७५, म्हसळा-४२५, श्रीवर्धन-६००, तळा-३२५ असे एकूण १७ हजार ३०० थाळींना मंजूरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व कार्यरत शिवभोजन केंद्रांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे  सूचना पाळणे आवश्यक आहे. 

ही भोजनालये दररोज फक्त दुपारी ११ ते ३ या वेळेत शिवभोजन उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू राहतील.  

•    भोजनालयातून व्यावसायिक कारणासाठी जेवण उपलब्ध करुन  दिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

•    शिवभोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो आवेष्टित स्वरुपात भोजन (Pack Food) पार्सल उपलब्ध करुन दयावे. 

•    सरकारने पुरविलेल्या मोबाईल APP (ॲप) मध्ये निर्धारीत केलेल्या वेळेतच, शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, फोटो, मोबाईल नंबर नोंदविण्यात यावा. 

•    शिवभोजन तयार करणा-या व्यक्तींनी शिवभोजन तयार करण्याआधी त्यांचे हात कमीत कमी २० सेंकद साबणाने स्वच्छ धुवावेत. त्याकरीता शिवभोजन चालकाने शिवभोजन उपलब्ध करुन देताना ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण

उपलब्ध करुन द्यावेत.

•    शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करुन घ्यावीत.  तसेच भोजनालय चालकांनी त्यांचे भोजनालय दररोज निर्जंतुक करुन घ्यावेत.

•    शिवभोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत.

•    शिवभोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा.

•    शिवभोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकामध्ये कमीत कमी तीन फूट (एक मीटर) अंतर राहील याची दक्षता घ्यावी.

•    शिवभोजनाच्या प्रति थाळीसाठी लाभधारकाकडून ५/- रुपये इतकी आकारणी करावी.  पुढील तीन महिन्यापर्यंत याच दराने शिवभोजन थाळीचा दर असेल.

•    करोना विषाणू प्रादूर्भावामुळे जे लोक (परराज्यातील कामगार, मजूर) स्वत:च्या जेवणाची सोय करु शकत नाहीत.  त्यांना शिवभोजनाचा लाभ प्राधान्याने द्यावा.  यासाठी तालुक्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घ्यावी.

•    कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरीत, बाहेरगावचे विदयार्थी उपाशी रहाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

तरी लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यामध्ये अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील इतर जिल्हयातील कामगार, मजूर, गरीब, गरजू लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.

वाचा - जितेंद्र आव्हाडांनी स्वतःला केले होम क्वारंटाईन