Sat, Dec 05, 2020 22:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 1510 नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 1510 नवे रुग्ण

Last Updated: Jul 07 2020 1:33AM
ठाणे/मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ठाणे जिल्ह्यात सोमवारी 1510 नवे रुग्ण सापडले तर 39 रुग्ण दगावले आहेत. कल्याण-डोंबिवलीत 413 तर ठाण्यात 268 नवे रुग्ण सापडले. कोरोनाचा उद्रेक संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून, एकूण रुग्णसंख्या 43 हजार 926 तर मृतांची संख्या 1308 वर पोहोचली आहे. 

मुंबईत सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये 1201ने वाढ झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 326 वर पोहोचला आहे. 39 जणांचा मृत्यू झाला असून 1201 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी राज्यभरात कोरोनाच्या 5368 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 87 हजार 681 रुग्णांवर (अ‍ॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात गेल्या चार दिवसापांसून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने चार   दिवसात 15 हजार रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी 3522 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 15 हजार 262 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.37 टक्के एवढे आहे.

ठाणे जिल्ह्यात 22 हजार 777 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 19 हजार 841 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात 1 हजार 510 नवे रुग्ण सापडले असून त्यापैकी कल्याणात 423, ठाणे 268, भिवंडी 88, अंबरनाथ 56, उल्हासनगर 159, बदलापूर 38, मीरा-भाईंदर 157, नवी मुंबई 164 आणि ठाणे ग्रामीणमध्ये 167 रुग्णांची नोंद झालेली आहे. अकरा हजार रुग्ण झालेल्या ठाणे महापालिका हद्दीत 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 416 वर पोहचला आहे. 

दहा हजार रुग्ण होऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली क्षेत्रात चार रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 144 झाली आहे. नवी मुंबईत 8, अंबरनाथ 5, बदलापूर 1, मीरा-भाईंदर 4 आणि उल्हासनगरमध्ये तीन रुग्ण दगावले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 43 हजार 926 वर गेली असून ती देशातील चौथ्या क्रमांकाची संख्या आहे.