Tue, Aug 04, 2020 14:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत १५ ते २०% समूह संसर्ग

मुंबईत १५ ते २०% समूह संसर्ग

Last Updated: Jul 03 2020 1:25AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगर परिसरात 15 ते 20 टक्के समूह संसर्गाचा प्रकार असू शकतो. राज्य सरकार त्यावर काम करत आहे. त्यामुळे मुंबई व परिसरातील काही भागात लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत, असे वक्तव्य उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी केले. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात अद्याप समूह संसर्ग नाही, असे सांगत तटकरे यांचा दावा फेटाळून लावला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मुंबई शहरात 80 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबई परिसरात 50 हजारांहून रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई महानगर परिसरात आजवर 1 लाख 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील ठराविक भागातच मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईत समूह संसर्ग असल्याची चर्चा असते. काही तज्ज्ञमंडळीही त्याला दुजोरा देतात. मात्र, राज्यात अद्याप समूह संसर्ग नाही, असे सरकारच्या वतीने वारंवार सांगण्यात आले. 

दरम्यान, मुंबईसह राज्यातील काही भागात समूह संसर्ग झाल्याची माहिती राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी यापूर्वीच दिली होती. आता राज्यातील मंत्रीच समूह संसर्ग झाल्याची माहिती देत आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणांतील गोंधळ कायम दिसून येत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तटकरे यांचा मुंबई महानगरात समूह संसर्ग स्प्रेड झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, राज्यात अद्याप कम्यूनिटी ट्रान्समिशन सुरू झालेले नाही. राज्यात आजवर जे रुग्ण आढळले आहेत त्या सर्वांचे ट्रेसिंग करण्यात यश मिळाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील तपासला असता ते सर्व कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने अथवा संस्थात्मक किंवा होम क्वारंटाईन असलेले बाधित आढळून आले आहेत. 

काही रुग्णांना लागण कशी झाली हे समजले नसले तरी बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याचे म्हणता येईल आणि अशांचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे राज्यात समूह संसर्ग नाही असे आपण म्हणू शकतो. 

मुंबई परिसरातील ठाणे, कल्याण 

डोंबिवली, वसई विरार, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल सारख्या मोठ्या शहरी भागांत संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आला असला तरी या कडक टाळेबंदीचा समूह संसर्गाशी संबंध संबंध जोडू नका, असे टोपे यांनी सांगितले.