Tue, Aug 04, 2020 14:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना आमदारासह ठाण्यात १३४० नवे कोरोना रुग्ण

सेना आमदारासह ठाण्यात १३४० नवे कोरोना रुग्ण

Last Updated: Jul 08 2020 1:35AM
मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेच्या एका आमदारासह 1 हजार 340 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने  ठाणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 45 हजार 266 वर पोहचली आहे. रुग्णांना वाचविण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असून, मंगळवारी 45 रुग्णांचा मृत्यू झाला आणि मृतांची संख्या 1 हजार 353 वर गेली आहे. 

मुंबईत मात्र कोरोना रुग्णांमध्ये घट दिसत असून, मंगळवारी 806 नवे रुग्ण सापडल्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 86 हजार 132 वर पोहोचला आहे. 64 जणांचा मृत्यू झाला असून 985 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4999 वर पोहचली आहे. तर हॉस्पिटलमध्ये आजही 22 हजार 996 रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यात मंगळवारी कोरोनाचे 5 हजार 134 नवे रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांची आतापर्यंतची संख्या 2 लाख 17 हजार 121 झाली आहे. आणखी 224 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या 9 हजार 250 वर पोहोचली आहे.  राज्यात सलग पाचव्या दिवशीही तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मंगळवारी 3296 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 558 झाली. सध्या राज्यात 89 हजार 294 रुग्णांवर (क्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात एक मंत्री, पाच आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. कडकडीत लॉकडाऊन असतानाही मुंबईपेक्षा ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. ठाण्यात 296 नवे रुग्ण सापडले असून तब्बल 16 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. ठाणे शहरातील मृतांचा आकडा 432 वर पोहचला असून रुग्णांची संख्या 11 हजार 295 झाली आहे. घोडबंदररोड, माजीवडा, मानपाडा परिसरात सर्वाधिक 75 रुग्ण सापडले असून नौपाड्यात 64 रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंब्य्रात फक्त तीन रुग्ण सापडले आहेत. कल्याण-डोंबिवलीत 381 नवे रुग्ण तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याणमधील एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. कल्याणमधील रुग्ण संख्या 9 हजार 880 झाली असून मृतांचा आकडा 151 आहे.  

मीरा-भाईंदर 162, नवी मुंबई 115, ठाणे ग्रामीण 124, भिवंडी महापालिका क्षेत्रात 30, अंबरनाथ 51, उल्हासनगर 119, बदलापूर 62 अशा नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. नवी मुंबईत पुन्हा 8 रुग्ण दगावले असून  अंबरनाथ 3, बदलापूर 1, मीरा-भाईंदर 4, ठाणे ग्रामीण 5, उल्हासनगरमध्ये एक असे रुग्ण दगावले आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणावर रुग्ण सापडत असतानाही अद्याप पुरेशा आरोग्य यंत्रणा उभारण्यात प्रशासनाला अपयश आलेले आहे.