Sat, Jul 11, 2020 09:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत 1274 नवे रुग्ण;  57 जणांचा मृत्यू

मुंबईत 1274 नवे रुग्ण;  57 जणांचा मृत्यू

Last Updated: Jun 07 2020 1:35AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

शनिवारी दिवसभरात मुंबईत कोरोनाच्या 1274 नवीन रुग्णांची भर पडली असून 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 21 जणांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. आता मुंबईत कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 1575 वर पोहचली आहे.

कोरोना स्थितीची रोजची माहिती देताना पालिकेचा आरोग्य विभाग आता सर्वप्रथम किती विक्रमी संख्येने रुग्ण बरे झाले याची माहिती देतो आणि त्यानंतर नव्या रुग्णांची किती भर पडली हे सांगतो. विशेष म्हणजे रोज हजार-बाराशेपेक्षा अधिक नव्या रुग्णांची भर पडत असताना त्याबद्दल चकार शब्द  उच्चारला जात नाही.  मुुंबईतील रुग्णवाढीचा दर नियंत्रणात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो.

मात्र रोज प्रचंड संख्येने येणार्‍या रुग्णांचे काय? याचा खुलासा होत नाही. आता तर मुंबईतील दुकानेही हळूहळू उघडू लागली आहेत आणि हॉटेल्सदेखील सुरू होत आहेत. अशात रोजची नव्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास बाजारपेठेला लावलेले कुलूप उघडणे मुंबईच्या अंगलट येण्याची भीती आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात तब्बल 1181 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले. गेल्या अडीच महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले. 

मुंबईत आतापर्यंत 19 हजार 978 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत 1274 नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 47 हजार 128 वर पोहचला आहे. मात्र बरे झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या वगळल्यास मुंबईत 25 हजार 575 रुग्णांवर हॉस्पिटल व विविध कोविड केंद्रांवर उपचार सुरु आहेत. 

राज्यात शनिवारी 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यात मुंबईत 58, ठाणे 10, उल्हासनगर 6, वसई विरार 1, भिवंडी 3, मीरा-भाईंदर 5, पालघर 1 रुग्णाचा समावेश आहे. 
राज्यातही कोरोनाचे 2739 रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण  रुग्णसंख्याही आता 82 हजार 968 झाली आहे. त्यापैकी 42 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  राज्यात 5 लाख 46 हजार 566 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 29 हजार 098 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 राज्यात आतापर्यंतचे बाधित रुग्ण 82,968

 बरे झालेले रुग्ण  : 37,390  मृत्यू  : 2969

 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू  : 9

 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : 42,600