राज्यातील 11 हजार कैद्यांना मिळणार तातडीने पॅरोल

Last Updated: Mar 27 2020 1:28AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहांत असलेल्या सुमारे 11 हजार कैद्यांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारागृह प्रशासनाला दिले आहेत. राज्यातील 60 कारागृहांत सुमारे 36 हजार आरोपी, गुन्हेगार बंदी आहेत. राज्यातील मध्यवर्ती कारागृह आणि जिल्हा कारागृहातील वर्ग 1,2 आणि 3 यांची एकत्रित कैदी बंदीची क्षमता 24 हजार इतकी आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा 50 टक्केहून अधिक म्हणजेच 12 हजार अधिकचे कैदी कारागृहात बंदी आहेत. हे एक प्रकारचे मानवी हक्कांचे उल्लंघन असून राज्यातील तुरुंग कोंडवाडे झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा तुरुंगाच्या स्थितीबाबत राज्य सरकारला फटकारले होते तसेच नवीन कारागृह उभारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सरकारने नेहमीप्रमाणे याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले.

दरम्यान सध्या राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने 20 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. याबाबत तुरुंगात असलेल्या कैद्याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. कोरोना पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्यांची वैद्यकीय तपासणी करावी. तसेच क्षमतेपेक्षा अधिक कैदी असलेल्या ठिकाणाहून इतर कारागृहांत हलविण्याचे आदेश गृहमंत्री देशमुख यांनी नुकतेच दिले होते.

मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील कैद्यांची संख्या मोठी आहे. येथे 800 कैद्यांची क्षमता असताना जवळपास 3600 कैदी कोंबले आहेत. ठाणे पुण्यातील येरवडा, तळोजा येथील कारागृह यांची स्थिती फार वेगळी नाही. त्यामुळे राज्य सरकारने तुरुंगात अतिरिक्त असलेल्या सुमारे बारा हजारपैकी सुमारे 11 हजार आरोपी, गुन्हेगार असलेल्या कैद्यांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पुढील आठवड्याभरात कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश देशमुख यांनी तुरुंग प्रशासनाला दिले आहेत.

7 वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील 60 तुरुंगांतील सुमारे 11, 000 कैद्यांना तातडीने म्हणजेच पुढील आठवड्याभरात पॅरोल देण्याचे आदेश दिले आहेत, असे ट्विट गृह मंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी केले.