Wed, Aug 12, 2020 04:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साकीनाक्यात भर रस्त्यात गोळीबार

साकीनाक्यात भर रस्त्यात गोळीबार

Published On: May 26 2019 1:45AM | Last Updated: May 26 2019 1:45AM
साकीनाका ः वार्ताहर

साकीनाका खैरानी रोडलगतच्या उच्चभ्रू नहार अमृत सोसायटीमधील रस्त्यावर शनिवारी ईबनेहसन अब्दुल हसन खान(60) यांची त्यांच्याच नातेवाईकाने गोळीबार करुन हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडवून दिली. घटनेनंतर स्वतःहून शरण गेलेल्या आरोपी इमामुद्दीन शुक्रला खान(60) याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.

मृत ईबनेहसन अब्दुल हसन खान हे नहार सोसायटीतील विंका बिल्डिंग येथे रहायचे. त्यांचे व्याही इमामुद्दीन शुक्रला खान देखील याच सोसायटीमध्ये राहतात. दोघेही मोठे व्यापारी असून मूळचे उत्तरप्रदेशचे आहेत. तीन वर्षांपूर्वी मयत ईबने हसन यांचा मुलगा अनिशशी आरोपी इमामुद्दीनची मुलगी आसिया हिचा विवाह झाला. 

विवाहानंतर नवदांपत्यामध्ये वारंवार भांडणे व्हायची. त्यामुळे दोन्ही कुटुंबात देखील वाद सुरु होते. शनिवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान डी.बी.रोड येथे इमामुद्दीन-ईबनेहसन दोघे समोरासमोर आले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी इमामुद्दीनने आपली परवानाधारक  बंदुक बाहेर काढली आणि तीन गोळ्या ईबनेहसन यांच्यावर झाडल्या. त्यानंतर आरोपी इमामुद्दीन बंदुकीसह साकीनाका पोलीस ठाण्यात गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ईबनेहसन यांना पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.