Fri, Oct 30, 2020 08:09होमपेज › Marathwada › धानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन

धानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 05 2018 11:57PMहिंगोली : प्रतिनिधी

कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील 34 महिला व पुरुष मजुरांनी मागील 60 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे, परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी मजुरांनी जिल्हाधिकारी कार्याला समोरील हिंगोली-नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने मजुरांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मागील दोन महिन्यांपासून कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तत्काळ काम उपलब्ध करून द्यावे, झालेल्या विलंबाबद्दल बेरोजगार भत्ता द्यावा, दोषी अधिकार्‍यांवर कार्यवाही करावी या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याने मजुरांनी अखेर शनिवारी जिल्हा कचेरीसमोरील हिंगोली-नांदेड महामार्गावर सकाळी अकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांना नोटीस बजाविण्यात आली होती. आचारसंहितेचे कारण समोर करीत आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. 

परंतु, मजुरांनी ठाम भूमिका घेत शनिवारी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला बेजार केले. आंदोलनापूर्वी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन सुरू केल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी मजुरांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. उशिरापर्यंत मजुरांसोबत चर्चा सुरू होती.