होमपेज › Marathwada › अ‍ॅपे उलटून महिला जागीच ठार

अ‍ॅपे उलटून महिला जागीच ठार

Last Updated: Jan 22 2020 2:12AM
रेणापूर : पुढारी वृत्तसेवा

समोरून अचानक आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अ‍ॅपेचालकाने ब्रेक लावल्याने अ‍ॅपे उलटून महिला ठार झाली, तर पाच जण जखमी झाले. मंगळवारी (दि.21) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास रेणापूर ते पिंपळफाटा रस्त्यावर शिवाजी महाविद्यालयासमोर हा अपघात झाला.

या अपघातात पद्मीनबाई रोहिदास बनसोडे (वय 60, रा. लातूर) ठार झाल्या. कुशाबाई निवृत्ती  समदडे (वय 65 ,रा. पुणे ), पार्वती निवृत्ती इटकर (वय 75, रा. पुणे ), ज्योती लोखंडे (वय 35, रा. पुणे ), शांताबाई भानुदास बनसोडे (वय 55, रा. लातूर), विठ्ठल माने (वय  55, रा. लोदगा ) हे जखमी झाले. जखमींना तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

या महिला लातूर येथून रेणापूरला नातेवाईकांकडे आल्या होत्या. नातेवाईकांना भेटून त्या शेरा ( ता. रेणापूर) येथे देवदर्शनासाठी  अ‍ॅपेने (क्र. एमएच 23 सी- 7162)  जात होत्या. रेणापूरपासून दीड किलोमीटर अंतरावर या अ‍ॅपेसमोर अचानक एक दुचाकी (क्र. एमएच 24-एजे- 8694 ) आली. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अ‍ॅपेचालकाने ब्रेक लावला. त्यामुळे भरधाव अ‍ॅपे उलटला. या अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पं.स.चे सभापती रमेश सोनवणे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एस अवस्थी, प्रा. मारुती सूर्यवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींना उपचारसाठी मदत केली. पोलिस उपनिरीक्षक श्रीराम माच्चेवाड, जमादार राजकुमार गुळभिले, सदाशिव हुंडेकरी, पोलिस नाईक धर्मवीर शिंदे, ईश्वर स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.