Sat, Sep 19, 2020 08:05होमपेज › Marathwada › उस्‍मानाबाद: 'त्‍या' विवाह सोहळ्यातून पसरला कोरोना, २०० जणांवर गुन्हा दाखल

उस्‍मानाबाद: 'त्‍या' विवाह सोहळ्यातून पसरला कोरोना, २०० जणांवर गुन्हा दाखल

Last Updated: Jul 14 2020 6:26PM
भूम (उस्‍मानाबाद) :  पुढारी वृत्तसेवा  

राळेसांगवी (ता. भूम) येथील विवाह सोहळ्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग अनेकांना झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वधू पित्यासह 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या  संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून तालुक्यातील नागरिक बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे. 29 जून रोजी तालुक्यातील राळेसांगवी येथे असाच प्रकार घडला. राळेसांगवी येथे मोठ्या थाटामाटात एक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 200 च्यावर पाहुणे उपस्थित होते. या विवाह सोहळ्यात खुद्द वधूच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे 3 जुलै रोजी निष्पन्न झाले. त्यानंतर आजतागायत ही साखळी अखंड सुरू राहून रुग्णांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. अनेक जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, तर  या सोहळ्यातील काही व्यक्ती अद्याप फरार आहेत. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

त्‍यामुळे एका व्यक्तीमुळे राळेसांघवी गावासह संपूर्ण तालुका अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष बाब म्हणजे या विवाह सोहळ्यास उपस्थित राहू न शकलेल्या जवळील व्यक्तींना साखर खाऊ घातली आहे. त्यामुळे आणखीन कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या विवाह सोहळ्यातील पहिला बाधित रुग्ण उपचार घेऊन बाहेर पडताच सदरील रुग्णाने कोरोनाबाबत नागरिकांना घाबरून न जाता उपचार घ्‍यावेत असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर सदरील माहिती जिल्हाधिकारी यांना कळताच त्‍यांनी पोलिसांना आदेशाचे उल्लंघन करणार्‍या विवाह सोहळ्यातील आयोजकांसह उपस्‍थित व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. 

त्या अनुषंगाने मंगळवारी (दि.13) पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी पत्रकार परिषद बोलावून विवाह सोहळ्यातील आयोजक व या विवाह सोहळ्यात व्हिडिओ चित्रीकरणात दिसणार्‍या 200 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची माहिती दिली. यावेळी खनाळ म्हणाले की, या विवाह सोहळ्यात लावलेले बँड पथक, ब्राह्मण, घोडा, मंडप इत्यादी व्यावसायिकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पुढे तालुक्यात असा प्रकार घडू नये, यासाठी आशा प्रकारच्या सामूहिक कार्यक्रमावर करडी नजर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवी, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गडवे, पो.हे.कॉ. विनोद जानराव, बाबा जाधवर, शशिकांत खोत, उंदरे  आदी उपस्थित होते.

 "