Wed, Jul 08, 2020 09:07होमपेज › Marathwada › अवकाळी पावसाचा तडाखा

अवकाळी पावसाचा तडाखा

Published On: Apr 17 2019 2:08AM | Last Updated: Apr 17 2019 1:43AM

नांदेड : शहरात मंगळवारी सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा :  

मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान अंगावर वीज पडून बीड आणि नांदेड जिल्ह्यांत दोघांचा मृत्यू झाला.  

बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील देवदहिफळ येथील श्रीहरी ऊर्फ बंडू भानुदास वड्डे मंगळवारी सायंकाळी शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुले बालंबाल बचावले. धारूर तालुक्यातील तेलगाव, भोगलवाडी, गावंदरा, हसनाबाद, मोहखेड परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला.  हसनाबादसह परिसरात गारपीटही झाली.  यात आंबा, भाजीपाला, फळबागा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मोहखेड (ता. धारूर) येथे मंगळवारी नानासाहेब शाहूराव सोळंके यांच्या शेतात  एक बैल आणि  वासरू वीज कोसळल्याने दगावले.  

नांदेडमध्ये एकाचा मृत्यू

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात सायंकाळच्या सुमारास  विजांच्या कडकडाटासह हलकासा पाऊस झाला. अंगावर वीज पडून देविदास उपाटे (वय 42, रा. बारड, ता. मुदखेड)  यांचा मृत्यू झाला. नांदेड  शहरातील  मुख्य रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने मंगळवारी वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले. सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणच्या    विद्युत तारा तुटल्यामुळे परिसरातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

३९ शेळ्यांसह दोन बैल दगावले

परभणी :  पाथरी तालुक्यातील गुंज या गावापासून जवळच अंधापुरी शिवारात  सोमवारी साडेसहा ते पावणेसातच्या दरम्यान  वीज  लिंबाच्या झाडावर पडली. यात  लिंबाजी सीताराम काळे (वय 40) व कृष्णा रामभाऊ शिंदे (वय 18, दोघेही रा. सुरणवाडी, ता. धारूर, जि. बीड) यांचा जागीच  मृत्यू झाला.  चंद्रकांत नारायण काळे,  रामभाऊ शिंदे हे जखमी झाले. यापैकी रामभाऊ शिंदे हे गंभीर जखमी आहेत.  मृतांपैकी कृष्णा शिंदे हा अंबाजोगाई येथे महाविद्यालयात अकरावी वर्गामध्ये शिक्षण घेत होता.  झाडाखाली असलेल्या 57 शेळ्यांपैकी 39 शेळ्यांवर काळाने घाला घातला.

वैजापूर तालुक्यात वीज कोसळून गाय ठार 

औरंगाबाद  ः   वैजापूर तालुक्यातील  नादी परिसरात झाडावर वीज कोसळून एक गाय ठार झाली असून गंगापूर तालुक्यातील अनेक गावांत घरांवरील पत्रे उडून गेले.  मंगळवारी सकाळी औरंगाबाद शहरासह  वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, सिल्‍लोड  तालुक्यातील बहुतांश भागात विजेचा कडकडाट, वादळी  वार्‍यासह   रिमझिम पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळाने वीज खांब कोसळले असून  तारा तुटल्याने  अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला. 

जालन्यात तापमान घसरले

जालना : जालना शहरात  दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून  42 अंश सेल्सिअसवरून तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले.    नवीन औद्योगिक वसाहतीत काही उद्योगांवरील पत्रे उडाल्याचे वृत्त आहे.  भोकरदन नाका परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे सर्वत्र धुळीचे लोट उडालेले दिसून आले. जिल्ह्यात बदनापूर, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी, भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला.