Fri, Jul 10, 2020 03:10होमपेज › Marathwada › गूढ स्फोटाने अंबाजोगाई हादरले

गूढ स्फोटाने अंबाजोगाई हादरले

Published On: Oct 31 2018 9:54AM | Last Updated: Oct 31 2018 9:36AMअंबाजोगाई : पुढारी ऑनलाईन 

अंबाजोगाई येथील  ‘हॉटेल अनिल’ येथे मंगळवारी रात्री गूढ स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशाचा झाला याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. सुदैवाने रात्री हॉटेल नुकतेच बंद केले असल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.

अंबाजोगाई पंचायत समितीसमोर सुर्यकांत विठ्ठल बनाळे यांचे 'अनिल' नावाचे हॉटेल आहे. शाकाहारी खवय्यांची या हॉटेलला पसंती असल्याने येथे कायम गर्दी असते. मंगळवारी रात्री ११ वाजता सर्व काम आटोपून बनाळे आणि सर्व कर्मचारी हॉटेल आणि स्वयंपाक घर बंद करून बाहेर पडले होते. त्याचवेळी स्वयंपाक घरात मोठा स्फोट झाला. या स्फोटात स्वयंपाक घराची भिंत कोसळली असून हादऱ्याने हॉटेलातील सामान अस्ताव्यस्त पडले. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असावा असे सुरुवातीस वाटल्याने बनाळे यांनी समयसुचकता दाखवत उर्वरित सर्व सिलेंडर बाहेर उघड्यावर आणून ठेवले. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत गेल्याने परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, थोड्यावेळाने स्वयंपाक घरातील धूर कमी झाल्यानंतर बनाळे यांनी पाहणी केली असता त्यांना सर्व सिलेंडर व्यवस्थित दिसून आले, तसेच कुठेही आग लागून नुकसान झाल्याचेही दिसले नाही असे बनाळे यांनी सांगितले. त्यामुळे भिंत पडण्याएवढा मोठा स्फोट कशाचा झाला असावा याबाबत गूढ अद्याप कायम आहे.

हॉटेल बंद झाल्याने मोठी दुर्घटना टळली 

या हॉटेलमध्ये सदोदीत मोठी गर्दी असते. गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली असती तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. शिवाय या हॉटेलच्या तळमजल्यावर बनाळे यांचे घर आहे. केवळ दैव बलवत्तर असल्यानेच कोणालाही इजा न होता किरकोळ नुकसानीवर मोठे संकट टळले.