Wed, Jul 08, 2020 17:23होमपेज › Marathwada › दुचाकी चोरट्याचा पोलिस कोठडीत गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकी चोरट्याचा पोलिस कोठडीत गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Aug 20 2019 3:06PM | Last Updated: Aug 20 2019 4:55PM
आखाडा बाळापूर ः प्रतिनिधी

मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने पोलिस कोठडीतच फरशीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात केला. या घटनेने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात खळबळ उडाली असून जखमीवर ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात स्थानीक गुन्हे शाखेने आरोपी देविदास बाबुराव कांबळे यास नांदेड येथून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून तब्बल 26 मोटार सायकली जप्त करून आखाडा बाळापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आल्या होत्या. बाळापूर पोलिसांनी देविदास कांबळे यास 18 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. न्यायालयातून परत येत असतांना त्याने कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांना गुंगारा देवून पोलिस वाहनातून पळ काढला होता. तब्बल दहा तासाच्या शोध मोहिमेतून सोमवारी मोरवाडी शिवारातील एका झाडावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. 

मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास त्याने पोलिस कोठडीतील फरशीच्या तुकड्याने स्वतःचा गळा चिरून घेत अंगावर पाघरून घेतले. काही वेळाने रक्तस्त्राव झाल्याचे पेालिस कर्मचार्‍यांच्या निर्देशनास आल्यानंतर त्याला तात्काळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून कांबळे यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आल्याचे बाळापूर पोलिसांनी सांगितले.