Mon, Dec 09, 2019 04:47होमपेज › Marathwada › हिंगोली : वाघाने केल्या चार गायी फस्त

हिंगोली : वाघाने केल्या चार गायी फस्त

Last Updated: Oct 31 2019 6:00PM
हिंगोली : प्रतिनिधी 

तालुक्यातील कलगाव, लिंबी शिवारात बुधवारी रात्री पट्टेदार वाघाने चार गायींचा फडशा पाडल्याची घटना घडली. यामुळे या भागातील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना मिळताच, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत, वाघाच्या ठशांची तपासणी केली. यामध्ये हे ठसे पट्टेदार वाघाचे असल्‍याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रथमच पट्टेदार वाघाचे अस्तित्व जाणवल्याने वनविभागही सतर्क झाला आहे. 

हिंगोली तालुक्यातील कलगाव व लिंबी शिवारात चार गायी फस्त केल्याची घटना घडल्याने शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली होती. काही शेतकर्‍यांनी बिबट्या असावा, असा अंदाजही व्यक्‍त केला होता. या घटनेची माहिती शेतकर्‍यांनी विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांना देताच त्यांनी वनविभागाचे पथक कलगाव, लिंबी, खंडाळा शिवारात पाठवुन ज्या ठिकाणी गायीवर हल्ला करण्यात आला.

ठिकाणच्या घटनास्थळाची पाहणी करून पायाचे ठसे घेतले. यामध्ये ते ठसे पट्टेदार वाघाचे असल्याचे स्पष्ट झाल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात प्रथमच पट्टेदार वाघाचे अस्तित्व आढळल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कलगाव येथील बाबुराव शेकुराव पौळ यांच्या 3 व लिंबी येथील श्रीराम मारोती बेले यांची 1 गाय फस्त केल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यात वाघाचे आगमन होण्याची ही पहिलीच घटना असल्याने विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी कलगाव परिसरातील माळरानात ट्रॅप कॅमेरा बसविला आहे. या कॅमेराच्या माध्यमातून पट्टेदार वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. वनविभागाच्या वतीने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, वाघाचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 

कलगाव शिवारात पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे पंजाच्या ठशावरून सिद्ध झाले आहे. यापूर्वी जिल्ह्यात कुठेही वाघ आढळल्याची नोंद नव्हती. शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, रात्री, अपरात्री एकटे फिरू नये, शेतात मुक्‍काम करण्याचे टाळावे, वाघाचा शोध सुरू असून, योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.