Sat, Apr 10, 2021 20:33
अंबाजोगाईच्या प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या मुलासह सुनेचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

Last Updated: Apr 08 2021 8:41PM

संग्रहित छायाचित्र
अंबाजोगाई :  पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई येथील किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी भरत रूद्रवार यांचा मुलगा बालाजी आणि सून आरती यांचा आमेरिकेत काल गूढ मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकन पोलिसांनी रुद्रावार कुटुंबियांना दिली. अमेरिकेतील पोलिसांनी तपासानंतरच सर्व माहिती उजेडात येईल असे सांगितले असल्याचे समजते.

अधिक वाचा : 'कोरोना संकटात गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी'

अंबाजोगाई शहरातील मोढा विभागातील किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा मुलगा बालाजी रूद्रवार (अंदाजे वय ३२ वर्ष) हा गेल्या सहा वर्षांपासून अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. गेली सहा वर्षांपासून बालाजी हा त्यांची पत्नी आरतीसोबत राहत होता. या दोघांना चार वर्षांची एक मुलगी असून तिचे नांव "विहा" आहे. याचबरोबर त्यांच्या घरी एक छोटा नवीन पाहुणाही येणार असल्यामुळे हे कुटुंब आनंदात होते.

अधिक वाचा : कोरोनामुक्त झालेली प्रिया म्हणते; ‘गो कोरोना गो’ 

काल ७ एप्रिल रोजी बालाजी रुद्रावार यांची चार वर्षांची चिमुकली "विहा" ही एकटीच गॅलरीत उभी राहून बराच वेळ रडत होती. यामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला असता बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. भारतीय वेळेनुसार गुरुवारी (दि.०८) सकाळी ९ वाजता तिथल्या पोलिसांनी या घटनेबाबत भारत रूद्रवार यांना फोनवरून माहिती दिली. 

या घटनेमुळे रूद्रवार कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. दरम्यान, रूद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अमेरिकन प्रमाण वेळेनुसार शवविच्छेदन झाल्यानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

चिमुकली सुखरूप या दुर्दैवी घटनेत चार वर्षीय चिमुकली विहा मात्र सुखरूप असून सध्या तिला शेजाऱ्यांकडे सोपविण्यात आले असल्याचे समजते आहे.

माजी मंत्री, खासदार, आमदार परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात 

या घटनेबाबत आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी खासदार प्रीतम मुंडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकारी अमेरिकेतील दुतावासाच्या संपर्कात असून गुरूवारी सायंकाळपर्यंत नेमकी घटना काय आहे याबाबत अधिकृत माहिती मिळणार आहे. अमेरिकेत रात्रीची वेळ असल्याने माहिती मिळण्यास विलंब होत होता.