Mon, Jul 06, 2020 18:18होमपेज › Marathwada › पित्याने केला मुलाचा निर्घृण खून

पित्याने केला मुलाचा निर्घृण खून

Published On: Dec 29 2018 1:48PM | Last Updated: Dec 29 2018 1:47PM
आखाडा बाळापूर (हिंगोली) : प्रतिनिधी 

बायको सोबत होत असलेल्या नेहमीच्या भांडणात आईला साथ देत असल्याचा राग मनात धरून पित्यानेच आपल्या १३ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे उघडकीस आली. 
शनिवारी (दि.२९) पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. यातील आरोपी पित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील रहिवाशी बाबुराव भगवानराव शिखरे (वय ३५) हा नेहमीच दारू पिऊन आपल्या पत्नीसोबत भांडण करीत असे. भांडणादरम्यान त्यांचा १३ वर्षीय मुलगा वैभव हा आईच्या बाजूने राहत असल्याचा राग मनात धरून शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास बाबुराव शिखरे याने वैभवला मामाच्या गावाला नेतो असे सांगून आपल्या ऑटो रिक्षात बसवून नांदेड- हिंगोली रस्त्यावरील कुर्तडी पाटीजवळ रिक्षा थांबवून वैभवच्या गळ्याला दोरी लावत आवळले. यात वैभवचा जीव जात नसल्याचे लक्षात येताच त्याचे डोके रिक्षावर आदळले. तरीही त्याचा जीव जात नसल्याने जवळच असलेला मोठा दगड घेवून वैभवच्या डोक्यात घातला. यात वैभवच्या डोक्याचा चेंदामेंदा होवून वैभवचा मृत्यू झाला. 

त्यानंतर बाबुराव शिखरे यांनी आपल्या मुलाचा मृतदेह रिक्षात टाकून आपल्या मावसभावाच्या दारात पायरीवर आणून ठेवत मीच मुलाचा खून केला असे ओरडू लागल्याने ग्रामस्थांनी ही माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक गणपत राहिरे, पोलिस उपनिरीक्षक सविता बोधनकर, संतोष नागरगोजे, गजानन भालेराव, मुलगीर यांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपी बाबुराव शिखरे यास ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.