हिंगोली : प्रतिनिधी
मागील काही महिन्यापासून औंढा नागनाथ तालुक्यातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याचा प्रकार उजेडात आला होता. सोमवारी (दि.8) औंढा नागनाथ तालुक्यातील दुरचूना भागात रानडुकराची शिकार करणार्या सहा जणांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
रविवारी सकाळी दुरचूना शिवारातील दिनकर केशव चव्हाण यांच्या मालकीच्या शेतात रानडूकराची शिकार केल्याची माहिती वन मंडळ अधिकारी तुराब अली सय्यद यांना मिळाल्यानंतर त्यांनी दुपारी 2 च्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. परंतु रानडुकराची शिकार करणारे आरोपी फरार झाले.
सोमवारी पुन्हा सकाळी दुरचूना शिवारात धाड टाकून आरोपी राजाराम गायकवाड, सुनिल धनवे, विठ्ठल आडे, उत्तम चव्हाण, परमेश्वर चव्हाण, राहूल आडे यांना ताब्यात घेवून वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय औंढा नागनाथ येथे आणले. आरोपीचा जबाव वन परिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे हे उशिरापर्यंत घेत होते. आरोपीला जेरबंद करण्यासाठी आर.पी.भिराने, वनराज राठोड, आदिनाथ भोसले यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, या प्रकरणातील शिकार झालेल्या रानडुकराचे अवयव वन विभागाच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली.