Wed, Jul 15, 2020 23:05होमपेज › Marathwada › शेतकरी आत्महत्येने सेना बॅकफुटवर 

शेतकरी आत्महत्येने सेना बॅकफुटवर 

Published On: Apr 16 2019 2:34AM | Last Updated: Apr 16 2019 2:34AM
भीमाशंकर वाघमारे

कसबे तडवळे येथील एका शेतकर्‍याने आत्महत्या करताना शिवसेना उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचे नाव लिहून ठेवल्याने राष्ट्रवादीला आयते कोलीत मिळाले. ती संधी साधलेल्या राष्ट्रवादीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवन राजेनिंबाळकर खून खटल्याला उजाळा देऊन बोचरा पलटवार केला. दुसरीकडे या दोन्ही प्रकरणांकडे बोट दाखवत बहुजन वंचित आघाडीनेही प्रचार अधिक धारदार केला आहे. खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी कापण्यात यश मिळाल्यानंतर उपनेते आ. तानाजी सावंत यांनी शिवसेनेची उमेदवारी ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना मिळवून दिली. त्यांना मकरंद राजेनिंबाळकरांचीही तितकीच साथ मिळाली.

त्यानंतर लागलीच राष्ट्रवादीनेही आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाची घोषणा करून लढत रंगतदार होणार हे अधोरेखित केले. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी संयमी प्रचार सुरू असतानाच शिवसेनेकडून आ. पाटील यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले. तेरणा कारखाना, जिल्हा बँकेचे नुकसान या विषयावर हे व्यंगचित्र राष्ट्रवादीला झोंबल्यानंतर त्यांनीही तेरणा कारखान्यातील भंगार विक्रीचे व्यंगचित्र प्रसिद्ध करून राजेनिंबाळकरांना अडचणीत आणले. हे कार्टूनवॉर जिल्ह्यात खूप गाजले. त्यानंतर राजेनिंबाळकरांनी स्वपक्षातील नेत्यांना म्हणजेच खा. गायकवाड, माजी आ. ज्ञानेश्‍वर पाटील, आ. तानाजी सावंत यांच्याबाबत अपशब्द उच्चारल्याची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली. त्यावेळीच राजेनिंबाळकर बॅकफुटला गेले. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून क्लीप डब करून माझी बदनामी केली जात असल्याचे म्हटले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या औशातील सभेने राजेनिंबाळकरांचा उत्साह दुणावला. त्यांचे शाब्दिक बाणही अधिक तिखट झाले. प्रचाराला दिशा मिळाली असतानाच कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे या शेतकर्‍यानेे आत्महत्या केली. 

माझ्या आत्महत्येला ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजप नेते विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांज्याजवळील चिठ्ठीत सापडला. या प्रकरणामुळे राजेनिंबाळकरांना पुन्हा हादरा बसला. त्यातून सावरण्यासाठी त्यांना मदत झाली ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांच्या जाहीर सभेची. या सभेत उद्धव यांनी ढवळे यांच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई होईलच, पण पवन राजेनिंबाळकरांच्या हल्लेखोरांनाही फासावर लटकवा, असे म्हणत राष्ट्रवादीची गोची केली. अर्थात प्रचाराची पातळी खालावू लागल्याचेच यातून दिसू लागले आहे. तर दोन्ही उमेदवारांची ही चिखलफेक दाखवत वंचित बहुजन आघाडीने आम्हीच तिसरा प्रबळ पर्याय असल्याचा प्रचार जोमात सुरू केला आहे. अर्जुन सलगर यांच्या प्रचारासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा झाल्यानंतर प्रचाराला शिस्त 
आली आहे. त्यामुळे ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांचाही उत्साह दुणावला आहे. 

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात रंगत वाढली असून सोमवारी झालेल्या शरद पवार यांच्या सभेने सांगता झाली. त्यांनी विकासाच्या मुद्यावर राणाजगजितसिंह पाटीलच कसे योग्य उमेदवार आहेत व नव्या पिढीकडे विकासाचा वारसा सुपूर्द करण्याची हीच वेळ असल्याचे सांगत मतदारांना केलेले भावनिक आवाहन चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळेच आता मतदार यावर काय निर्णय घेतो हे मतमोजणीनंतरच कळणार आहे.