Wed, Jul 15, 2020 17:18होमपेज › Marathwada › शाकंभरी नवरात्रौत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ

शाकंभरी नवरात्रौत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ

Published On: Jan 14 2019 1:21AM | Last Updated: Jan 13 2019 11:24PM
तुळजापूर : संजय कुलकर्णी

आराध्य दैवत, शक्तिदेवता तथा महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सोमवारी (14 जानेवारी) दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी रविवारी 6 जानेवारी रोजी सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा सोमवारी पहाटे पूर्ण होत असून मुख्य मूर्तीची सिंहासनावर पुनर्प्रतिष्ठापना होऊन मूर्तीला आठ दिवसानंतर पंचामृत अभिषेक सुरू होणार आहेत.

त्यानंतर चरणतीर्थ, काकडा आरती पार पडून नित्यपूजेची घाट सकाळी 6 वाजता होणार आहे. मातेच्या मूर्तीला दुसर्‍यांदा पुन्हा पंचामृत अभिषेक सुरू होऊन वस्त्रालंकार षोडशोपचार पूजा पार पडल्यानंतर धुपारती अंगारा काढण्यात येणार आहे. यावर्षी या नवरात्र महोत्सवातील धार्मिक सोहळ्याचे यजमानपद पाळीकर पुजारी मंडळाकडे असून मातेच्या पितळी दरवाजा समोरील ओवरीमध्ये शाकंभरी देवीची प्रतिमा स्थापना करून यजमान पुजारी सतीश रामचंद्र सोमाजी यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होवून शाकंभरी नवरात्र महोत्सवास प्रारंभ होईल. त्यानंतर नवरात्रोत्सव काळात अनुष्ठानासाठी ब्रह्मवृंदाना वर्णी देण्यात येणार आहे.

18 जानेवारीला जलयात्रेचा सोहळा सोमवारपासून सुरू होणार्‍या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील पाचव्या दिवशी (18 जानेवारी) जलकुंभाच्या मिरवणुकीचा (जलयात्रा) मुख्य सोहळा पार पडणार असून या यात्रेत शहर व परिसरातील हजारो महिला, सुवासिनी, कुमारिका यांच्यासह नवरात्र महोत्सवाचे यजमान, मातेचे मुख्य महंत, पुजार्‍यांसह मंदिराचे अधिकारी, कर्मचारीही सहभागी होणार आहेत. या नवरात्र महोत्सवातही मातेच्या विविध रूपातील अलंकार महापूजा व रात्रौ छबीना मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.