Thu, Jul 02, 2020 16:58होमपेज › Marathwada › बीड : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास मिळाले सात व्हेंटिलेटर्स

बीड : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास मिळाले सात व्हेंटिलेटर्स

Last Updated: May 21 2020 2:53PM

हाफकीन महामंडळाने सात नवीन व्हेंटिलेटर्स दिले.अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा 

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास नवसंजीवनी प्राप्त झाली. हाफकीन महामंडळाने सात नवीन व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत. हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाचे राजेश देशमुख यांनी मंत्री मुंडे यांच्या विनंतीवरून हे ७ व्हेंटिलेटर्स त्यांच्याकडील सीएसआर निधीतून स्वाराती रुग्णालयाला मोफत उपलब्ध करून दिले आहेत.

वाचा :बुलडाणा जिल्ह्यात २ रूग्णांची वाढ

मंत्री मुंडे यांनी गेल्याच आठवड्यात स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात भेट देऊन तेथील कोविड-19 उपाययोजनेसह अन्य साधन सामग्री व सर्व सुविधांचा आढावा घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हाफकीनमार्फत रुग्णालयाची अनेक वर्षांपासूनची एम आर आय मशीनची मागणी पूर्ण केली. या मशीनची खरेदी विहित निविदेमार्फत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आतापर्यंत स्वारातीमध्ये १३ व्हेंटिलेटर्स असून, यापैकी तीन व्हेंटिलेटर हे खास कोविड-19 कक्षासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित १० रुग्णालयातील नेहमीच्या उपचारांसाठी उपलब्ध आहेत. ते मुंबईतून रवाना झाले असून, शुक्रवारी (दि. २२) रुग्णालयात दाखल होतील अशी माहिती हाफकीनचे राजेश देशमुख यांनी दिली.

स्वाराती रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या तथा कोविड - 19 चा बीड जिल्ह्यात झालेला शिरकाव पाहता अधिकचे व्हेंटिलेटर्स म्हणजे रुग्णालयासाठी नवसंजीवनीच आहे, असे म्हणत स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी मागील दोन महिन्यात अंबाजोगाईच्या या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या रुग्णालय परिसरातील जुन्या परंतु वापरण्यास योग्य नसलेल्या अनेक इमारतींचे नूतनीकरण करून त्या रुग्णांसाठी वापरल्या जात आहेत.

रूग्णालयासाठी लागणारी वैद्यकीय साधनसामग्री ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली जात असून, रुग्णालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच एम आर आय मशीन मिळणार आहे. त्यापाठोपाठ व्हेंटिलेटर ही सुविधा करून देण्यात मुंडे यांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या निमित्ताने अंबाजोगाईच्या रुग्णालयात एक प्रकारे नवसंजीवनी मिळवून दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

वाचा :नव्या सहा रुग्णांमुळे उस्मानाबाद जिल्हा हादरला