होमपेज › Marathwada › तंबाखूमुक्त शाळेचा विडा

तंबाखूमुक्त शाळेचा विडा

Published On: Mar 13 2018 9:31PM | Last Updated: Mar 13 2018 9:31PMबीड : दिनेश गुळवे

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची मळणी केल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तंबाखू मुक्त शाळांचा विडा उचलला आहे. व्यसनांचा विळखा हा बाल व किशोर वयातूनच पडत असल्याने व्यसनाधिनतेची मोठी समस्या निर्माण होत आहे. घरातील वडिलधारी मंडळी तंबाखूचा विडा मळीत असल्याने त्यांचाच कित्ता लहान मुले गिरवतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे आता तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम राबविला जात आहे. 

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना ककर्र्रोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील शाळा तंबाखू मुक्त करण्याचा निर्धार करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने गेवराई तालुका सीईओ अमोल येडगे यांनी दत्तक घेतला आहे. 

तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी 11 निकष पाळावे लागणार आहेत. यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक यांना तंबाखूमुक्त व्हावे लागणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे इतर विभागही मदत करणार आहेत. तंबाखूमुक्त शाळेमध्ये शिक्षक, विद्यार्थी वा इतरांना तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही, यासाठी शाळेत समिती स्थापन करणे, शाळेत तंबाखू सेवन करणे गुन्हा असल्याचा फलक लावणे, तंबाखूचे दुष्परिणाम व नियंत्रणाचे फायदे याची माहिती देणे, मुख्यध्यापकांकडे तंबाखू उत्पादन कायद्याची प्रत ठेवणे, तंबाखू मुक्तीसाठी डॉक्टर, राज्य समिती यांची मदत घेणे, शाळेत माहिती सत्रासह दंत व आरोग्य तपासणी करणे, तंबाखू मुक्तीचे कार्य करणार्‍यांचा सत्कार करणे व तंबाखू मुक्त शाळा, परिसर असा फलक लावणे आदी कामे या अभियान अंतर्गत करण्यात येत आहेत. 

तंबाखू विकणे, सेवन करणे गुन्हा

शाळांसह सार्वजनिक जागा आदी ठिकाणी तंबाखू सेवन करणे हा गुन्हा आहे. शाळांजवळ अशा पदार्थांची विक्री करणे हाही गुन्हा आहे. असे केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी माहिती गेवराई तालुका समन्यवक तथा तरटेवाडी जि. प. शाळेतील शिक्षक एस. पी. जोशी यांनी दिली. 

गेवराईतील सहा शाळा तंबाखूमुक्त

जिल्ह्यात गेवराई तालुका हे सीईओ अमोल येडगे यांनी दत्तक घेतला आहे. या तालुक्यातील 320 शाळा या 20 मार्च पर्यंत तंबाखू मुक्त करण्यात येणार आहेत. आतापर्यंत सहा शाळा तंबाखूमुक्त झाल्याअसून इतर शाळाही तंबाखू मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षक कैलास आरबड यांनी दिली.