Wed, Sep 23, 2020 03:05होमपेज › Marathwada › मराठी कलाकारांचा पुढाकाराने परभणीकर आता कोकणाची हिरवळ भोगदेवीत अनुभवणार

मराठी कलाकारांचा पुढाकाराने परभणीकर आता कोकणाची हिरवळ भोगदेवीत अनुभवणार

Last Updated: Jul 06 2020 7:54PM
जिंतूर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील भोगाव (देवी) येथे मागील दीड वर्षापासून 'एक मूल तीस झाडे' अभियाना अंतर्गत संस्थांनच्या 70 एकर जमिनीवर अण्णा जगताप आणि रवी देशमुख पर्यटनस्थळ उभे करत आहेत. या वर्षीपासून या भोगावदेवी पर्यटनस्थळावर सह्याद्री देवराई उभी करण्यासाठी चित्रपट अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

मागील दीड वर्षापासून लावलेली रोपे सात ते आठ फूट मोठी झाले आहेत. हळूहळू पर्यटन स्थळाचा परिसर हिरवागार होत चालला आहे. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी उपयोगी फळबाग उभी केली जाणार आहे. हाती घेतलेलं काम हळूहळू पूर्णत्वास यायला लागले आहे. जिल्ह्यातील अनेक जाणकार मंडळी हे पर्यटन स्थळ उभे करण्यासाठी पुढे आली आहेत. 

या पर्यटन स्थळाच्या माध्यमातून परिसरातील अनेक लोकांना फायदा होणार आहे. सद्य परिस्थितीमध्ये संस्थांनची 70 एकर जमीन, मंदिराच्या बाजूला असलेला मोठा तलाव व पाठीमागच्या अजिंठ्याच्या रांगेमध्ये वन विभागाची जमीन येथे काम करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. पर्यटनासाठी परभणी जिल्ह्यातील व परिसरातील पर्यटकांना कोकणामध्ये किंवा इतर ठिकाणी जावे लागते. मराठवाड्यामध्ये एखादा असा परिसर किंवा मोठी बाग नाही. निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण व्यतित करता येईल व त्या बागेचा फायदा माणसांबरोबरच पशू पक्ष्यांनाही होईल. हाच उदात्त  हेतू डोळ्यासमोर ठेवून पर्यटन स्थळ विकसित केल्या जात आहे. 

या पर्यटन स्थळामध्ये विविध प्रकारची फळझाडे तर असतीलच त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्याची साधने व बोटिंगची व्यवस्था, शेतकरी साधनांचे संग्राहालय  देखील करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरून पर्यटक आकर्षित होऊन आपल्याच भागात पर्यटनासाठी येतील. याचाच एक भाग म्हणून या पर्यटनस्थळावर चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे हे अण्णा जगताप आणि रवी देशमुख यांच्या मदतीसाठी सह्याद्री देवराई पर्यटन स्थळावर उभी करण्यासाठी सरसावले आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराईचा प्रकल्प हाती घेतला आहे. लवकरच ते उपस्थित राहून सह्याद्री देवराई पर्यटनस्थळावरती वृक्षलागवड करून या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत. चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे पर्यटन स्थळावर सह्याद्री देवराई करण्याचे निश्चित केल्यामुळे परभणी जिल्ह्यातील वृक्षप्रेमी सुखावले आहेत.

सह्याद्री देवराई ही लोकचळवळ व्हावी : सयाजी शिंदे

भोगावदेवी पर्यटनस्थळावर सह्याद्री देवराई उभी करण्यासाठी ही एक मोठी लोकचळवळ उभी राहावी असे मत स्पष्ट करून यासाठी मी लवकरच येत आहे असे सयाजी शिंदे यांनी जाहीर केले. अण्णा जगताप आणि रवी देशमुख बरोबरच परिसरातील जाणकर वृक्षप्रेमी, व्यापारी व प्रतिष्ठित मंडळींनी हे पर्यटन स्थळ उभे करण्यासाठी सहकार्य करावे. आई जगदंबेच्या परिसरात आपण सह्याद्री देवराई उभी करूया असे चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले. 

शेतकरी बापाच्या जीवनातील नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ दूर करण्यासाठी 'एक मूल तीस झाडे' अभियान काम करते. या अभियानाने भोगाव  देवी येथे संस्थांच्या 70 एकर जमिनीवर पर्यटनस्थळ उभे करण्याचा निश्चय केला. मागील दीड वर्षापासून रवी देशमुख यांनी पुढाकार घेऊन काम सुरू केले आहे. आता चित्रपट अभिनेते या पर्यटनस्थळावर सह्याद्री देवराई उभी करण्यासाठी येत आहे. आपणही सहभागी होऊन सहकार्य करावे असे आव्हान  'एक मूल तीस झाडे' अभियानाचे प्रमुख अण्णा जगताप यांनी केले आहे

अण्णा जगताप, चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे आणि परिसरातील सर्व मिळून पर्यटन स्थळावर सह्याद्री देवराई करत आहोत. परभणी जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील  वृक्षप्रेमीनी सहकार्य करावे. आपल्या परिसरांमधे आपण एक मोठे पर्यटन स्थळ व सह्याद्री देवराई उभी राहील. ज्याचा उपयोग परिसरातील सर्वांना होईल 

भोगावदेवीपर्यटनस्थळ सह्याद्री देवराई : रवी देशमुख

या पर्यटन स्थळावर आंबा, चिंच, जांभूळ, रामफळ, सिताफळ, कवठ, बिबा, उंबर, वड, पिंपळ, लिंब, फिंरंगी चिंच,डाळिंब इत्यादी सारखे दीर्घकाळ टिकणारी फळझाडे लावली जाणार आहेत. परिसरातील जाणकार व्यापारी, उद्योगपती, शिकलेली, नोकरदार, समाजकारणी, समाजसेवक व राजकीय व्यक्तींना सहकार्य करण्याचे आवाहन भोगावदेवी पर्यटनस्थळ, सह्याद्री देवराई मार्फत चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, अण्णा जगताप, रवी देशमुख यांच्यामार्फत केले जात आहे.

 "