Fri, Jul 10, 2020 02:36होमपेज › Marathwada › साक्षरता भारत योजनेचा कार्यकाळ संपुष्टात

साक्षरता भारत योजनेचा कार्यकाळ संपुष्टात

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 19 2018 11:22PMपरभणी : प्रदीप कांबळे

राज्य शासनाच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी 2012 पासून सुरू केलेल्या साक्षर भारत योजनेचा कालावधी 31 मार्च 2018 रोजी संपुष्टात आला आहे. परंतु या योजनेच्या अंमलबजावणीकरिता ग्राम लोकशिक्षण समितीतर्फे नियुक्‍त केलेल्या जिल्ह्यातील 307 ग्रामपंचायती क्षेत्रातील 1406 प्रेरक-प्रेरिकांचे अंदाजित 39 महिन्यांचे 10 कोटी 96 लाख 68 हजार रुपये वेतन शासनाकडे थकले आहे. तसेच राज्यात लवकरच अशाच प्रकारची नवीन योजना सुरू होणार आहे.

साक्षरतेमध्ये वाढ व्हावी, शिकून सवरून लोक शहाणे व्हावेत, नागरिकांमध्ये सजगता वाढावी यासाठी शिक्षण प्रसाराचे काम गेल्या कित्येक वषार्र्ंपासून सुरू आहे. लहान मुलांना जसे प्राथमिक शिक्षण सक्‍तीने व मोफत दिले जात आहे. त्याचप्रमाणे निरक्षर तरुण व ज्येष्ठ नागरिकांनाही अक्षर ओळख करून देण्यासाठी राज्य शासनाने सन 2012 पासून साक्षर भारत योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 703 ग्रामपंचायतींमध्ये गावपातळीवर ग्राम लोकशिक्षण समिती तयार करून प्रत्येक गावात दोन अशा 1406 प्रेरक-प्रेरिकांची नियुक्‍ती करण्यात आली.

निरक्षरांना अक्षर ओळख, आकडेमोड करण्याचे काम सतत 2 हजार रुपये इतक्या मानधनावर पाच वर्षे करून 7 हजार 643 महिला-पुरुषांना साक्षर केले. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासन मुक्‍तशाळा निर्माण करण्याच्या विचारात आहे. परंतु या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेली असताना 39 महिन्यांचे वेतन थकीत ठेवून जिल्ह्यातील प्रेरक-प्रेरिकांना शासनाने वेठीस धरले आहे. योजनेचा कार्यकाळ संपल्याने हाताला काम नाही, केलेल्या कामाचा दामही नाही यामुळे त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता शासनाने माहिती मागवली असून नवीन पढना लिखना योजना सुरू होणार असल्याची शक्यता आहे. नियुक्‍त केलेल्या सर्व प्रेरक-प्रेरिकांना त्यात नियमित करण्याची शक्यता असून यापूर्वीच्या साक्षर भारत योजनेचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे, अशी माहिती सहायक प्रकल्प अधिकारी जी.एस.मोरे यांनी दिली आहे. 

साक्षर भारत योजनेचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. या संदर्भात सर्व माहिती शासनास कळविली आहे. नियुक्‍त केलेल्या प्रेरक-प्रेरिकांचे प्रलंबित वेतन अदा करण्याबाबतची माहिती शासनास कळविली आहे. प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू आहे. या योजनेच्या संदर्भात शासनाच्या सूचना येतील त्यानुसार कार्य केल्या जाईल. यात नवीन पढना लिखना योजना सुरू होण्याची शक्यता आहे.
-एस.एम.चौधरी, उपशिक्षणाधिकारी (निरंतर) जि.प.परभणी