होमपेज › Marathwada › हजार कामांतून वीस हजार मजुरांना रोजगार

हजार कामांतून वीस हजार मजुरांना रोजगार

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 1:42AMबीड : प्रतिनिधी

शेतीची कामे आटोपल्याने मजुरांना काम देता का काम? म्हणण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितीस रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आज घडीला जिल्ह्यात एक हजार विहिरींचे कामे सुरू असून यावर वीस हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतीची जवळपास पूर्ण कामे झालेली असतात. त्यामुळे बहुतांश मजुरांच्या हातांना कामे नसतात. काही ठिकाणी शेतीची कामे असली तरी ती थोड्या प्रमाणातच असतात. त्यामुळे मजुरांकडून अशावेळी कामाची मागणी वाढलेली असते. 

बीड जिल्ह्यातही सध्या बहुतांश ठिकाणी शेतीची कामे आटोपली आहेत. त्यामुळे मजुरांना रोजगार हवा आहे. अशा परिस्थितीत सध्या रोजगार हमी योजनेच्या विहिरींची कामे सुरू झाली आहेत. अहिल्यादेवी सिंचन योजने अंतर्गत जिल्ह्यात चार हजार 56 विहिरींच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे. यातील अनेक कामे सुरू आहेत. सध्यात जिल्ह्यात एक हजार 329 कामे सुरू आहेत. यातील विहिरींच्या 923 कामांवर 19 हजार 93 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अधिकाधिक मजुरांना रोजगार मिळावा यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजनबद्ध कामे करण्यात येत आहेत. 

मान्सूनची अडचण

रोजगार हमी योजनेमध्ये अगोदर मंजूर असलेल्या विहिरींच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. ही कामे अगोदर पूर्ण करावीत, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. याच दरम्यान अनेक नवीन प्रस्ताव आहेत. सध्या आचार संहिताही आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रस्ताव आलेले आहेत. आता मे चा शेवटचा आठवडा येऊ घातला आहे. यंदा मान्सूनही अगोदर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीत विहिरींची कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

उदिष्ट पूर्ण होणार कसे?

अहिल्यादेवी सिंचन योजनेद्वारे 2016-17 व 2017-18 या दोन वर्षांत पाच हजार 900 विहिरी करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. यासह अगोदर मंजूर असलेल्या विहिरींचे कामही मोठ्या प्रमाणावर राहिलेले आहे. याच दरम्यान कामांना मंजुरी, कामे संथगतीने होत असल्यानंतरही दोन वर्षांत विहिरींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.