Sat, Aug 08, 2020 03:35होमपेज › Marathwada › बसस्थानकात येताच मणक्याला दणका

बसस्थानकात येताच मणक्याला दणका

Published On: Nov 19 2018 1:02AM | Last Updated: Nov 18 2018 11:32PMबीड : उदय नागरगोजे

बसने प्रवास करून बीडमध्ये आलेल्या प्रवाशाला जोराचा आदळा बसताच बसस्थानक आल्याचा अंदाज येत आहे. ज्या गेटमधून बस बसस्थानकात येतात तेथे तसेच आवारात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून याच्या दुरुस्तीकडे बसस्थानक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाणी, स्वच्छता या समस्या तर कायमच आहेत.

सोलापूर-धुळे महामार्गावर बीड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. यामुळे साहजिकच बसेसची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा येथे असते. या प्रवाशांना सोयी पुरविणे हे बसस्थानक प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु सोयी तर दूर बसस्थानक परिसराची स्वच्छता, दुरुस्ती, पिण्याचे पाणी यासारख्या गोष्टींकडेही दुर्लक्ष होतांना दिसते. बसस्थानकात बस प्रवेश करतात त्या गेटसमोरच मोठमोठे खड्डे पडले असून त्याच्या दुरुस्तीकडे गत काही महिन्यांपासून दुर्लक्ष होत आहे. काही प्रवाशी  नियमीतपणे ये-जा करत असतात, त्यांना बसस्थानकातील या खड्ड्यांची चांगलीच ओळख झाली आहे. प्रवासादरम्यान झोप लागली तरी जोराचा दणका बसला की बसस्थानक आले म्हणून ते ओळखतात. बसस्थानक नुतनीकरण होणार असल्याची चर्चा गत काही महिन्यांपासून होत असली तरी अद्याप या कामाला मुहूर्त लागलेला नाही.