किल्ले धारुर (बीड) : प्रतिनिधी
धारुर शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी अंत्यसंस्कारासाठी स्मशानभुमीकडे शव नेण्यासाठी रस्ता नसल्याच्या निषेधार्थ लिंगायत समाज बांधवानी आज, सोमवार (दि.४) एका मयत महिलेचे शव धारुर तहसिल कार्यालयात नेऊन ठेवत तीव्र भावना व्यक्त केल्या. या प्रकारामुळे तहसिल प्रशासन पुर्णतः हादरुन गेले होते.
धारुर शहरातील सर्वे नंबर ३७८ मध्ये वाणी समाजाची स्मशानभूमी आहे. स्मशानभुमीकडे जाणार्या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाता येत नाही. तसेच स्मशानभुमीत खड्डा खोदण्यासाठी या रस्त्यावरुन जेसीबी मशीन नेता येत नाही. या संदर्भात लिंगायत समाजाच्यावतीने धारुर तहसिल प्रशासनास वेळोवेळी निवेदन व अर्ज दिले आहेत, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
दरम्यान, लिंगायत समाजातील जयश्री मारोती किनकर (वय ५५) यांचे आज, सोमवारी निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहमीची समस्या उद्वभवली. त्यामुळे समाज बांधव संतप्त झाले. त्यांनी सदरील महिलेचे शव थेट धारुर तहसिल कार्यालयात नेऊन ठेवले. यामुळे एकच गोंधळ उडाला. महिलेचे सर्व नातेवाईक यांनी तहसिल कार्यालयात ठिय्या मांडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. यावेळी पोलिसांचे पाचारण करण्यात आल्याने तहसिल कार्यालयास छावणीचे स्वरुप आले होते.
यावेळी या समाजबांधवानी स्मशानभुमीपर्यंत रस्ता झाल्या शिवाय आम्ही अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली होती. नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी उपस्थित लोकांना शांत राहून अंत्यसंस्कार करण्याची विनंती करत होते. पर्यायी रस्ता काढण्यासाठी गोपाळपूर ग्रामपंचायातीचे ग्रामसेवक संजय देशमुख,उपसरपंच सुरेश सावंत, सदस्य राजेश सोनवने प्रयत्न करत होते. मात्र दुपारपर्यत सदरील महिलेचे शव तहसिल कार्यालयातच होते.