होमपेज › Marathwada › ‘त्या’ विद्यार्थ्याचा मृत्यू लाठीहल्ल्यातच : हर्षवर्धन

‘त्या’ विद्यार्थ्याचा मृत्यू लाठीहल्ल्यातच : हर्षवर्धन

Published On: Jan 16 2018 9:14AM | Last Updated: Jan 16 2018 9:14AM

बुकमार्क करा
नांदेड :  प्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथील दंगलीचे पडसाद नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमटले होते. आष्टी येथे पोलिसांच्या लाठीहल्ल्यात योगेश जाधव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोप फेटाळून लावला होता. मात्र या विद्यार्थ्याचा मृत्यू हा पोलिसांच्या लाठीहल्ल्यातच झाला असल्याचा आरोप  नसोसवायएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. या वेळी बोलताना हर्षवर्धन म्हणाले, की आष्टी येथे दि. 3 जानेवारी रोजी दहावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी योगेश प्रल्हाद जाधव याचा मृत्यू हा पोलिसांची लाठी बसल्याने झाला. मात्र पोलिसांनी फिर्यादीची नोंद न घेता अकस्मातमृत्यू नोंदविला. या संदर्भात नसोसवायएफने दि. 7 जानेवारी रोजी सात सदस्यीय समिती नेमली होती.

या समितीने दि. 9 जानेवारी रोजी आष्टी या गावाचा दौरा केला, योगेशच्या मृत्यूची माहिती समितीने गावातील बर्‍याच लोकांशी चर्चा केली. यात संविधान जाधव, यशवंत प्रधान, प्रकाश वाघमारे, तसेच आठवीत शिकणारा विद्यार्थी अंकुश कांबळे, गावचे सरपंच काशीनाथ शिंदे, मुख्याध्यापक बी.एस. गंगासागर, सतीश दरक, ज्ञानेश्‍वर  शिंदे, आनंद कंधारे यांच्याशी प्रत्यक्ष बोलून चर्चा केली. तसेच प्रशासकीय बाजू म्हणून डॉ. जी.एन. रायभोळे, तामसा पोलिस निरीक्षक गोमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर यांच्याशी चर्चा झाल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. या लोकांशी चर्चा केल्यानंतर सात सदस्यीय  समितीने अहवाल तयार केला, दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, तसेच योगेश जाधव याच्या  कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत  जाहीर करावी, असे अहवालात नमूद केल्याचे डी. हर्षवर्धन यांनी सांगितले.