Sat, Jul 04, 2020 05:53होमपेज › Marathwada › शेतकरी मृत्यूप्रकरणी तलाठी निलंबित

शेतकरी मृत्यूप्रकरणी तलाठी निलंबित

Published On: Jul 25 2019 1:50AM | Last Updated: Jul 24 2019 10:39PM
पाथरी : प्रतिनिधी

शेतकर्‍याच्या मृत्यूप्रकरणी माळीवाडा सज्जाचे तलाठी व्ही. पी. नागरगोजे यांना पाथरीचे उपविभागीय महसूल अधिकारी व्ही. एल. कोळी यांनी बुधवारी (दि. 24)  निलंबित केले.

शेतीच्या सातबारा उतार्‍यावरून नाव  अचानक वगळण्यात आल्याने प्रधानमंत्री किसान पीक विमा भरता येत नसल्याच्या धक्क्याने तुरा येथील शेतकर्‍याचा मंगळवारी (दि.23)  मृत्यू  झाला होता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक विमा भरण्यासाठी ऑनलाइन सातबारा उतारा आवश्यक आहे. त्यासाठी तलाठी कार्यालयात काही दिवसांपासून शेतकर्‍यांची  गर्दी होेत आहे.

तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक  (वय 55) यांची गट क्र.131 मधील 71 आर शेती ऑनलाइन 7 बारा उतार्‍यार दिसत नव्हती. ते विमा भरण्यासाठी सातबारा उतारा काढण्यासाठी रोज चकरा मारत होते. मात्र सातबारा दुरुस्ती न झाल्याने ते काळजीत होते.  सातबारा कसा भरणार या विंवचनेतून ते तणावात होते. मंगळवारी (दि.23 )  तलाठी व्ही. पी. नागरगोजे यांच्या पाथरी येथील शिक्षक कॉलनीत असलेल्या खासगी सज्जावर याच काळजीतून हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणास शासकीय यंत्रणा जबाबदार असून  कारवाई झाल्याशिवाय आणि मदत मिळाल्याशिवाय मृतदेह न हलवण्याचा निर्णय त्यांच्या  नातेवाईकांनी घेतला होता. शेवटी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह गावी नेण्यात आले.  दरम्यान या प्रकरणी जमीन महसूल अधिनियम 166 चे कलम 155 चे तुरा येथील शेतकर्‍याचे प्रकरण विहित मुदतीत दाखल न केल्याचा ठपका ठेवत तलाठी व्ही.पी.नागरगोजे यांना उपविभागीय अधिकारी व्ही.एल.कोळी यांनी  बुधवारी निलंबित केले आहे.