होमपेज › Marathwada › पाथरीच जन्मस्थळ, समिती नेमावी

पाथरीच जन्मस्थळ, समिती नेमावी

Last Updated: Jan 22 2020 2:12AM
पाथरी : पुढारी वृतसेवा 
पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असून, याविषयी निर्माण झालेल्या वादाची तड लागावी म्हणून शासनाने समिती नेमावी, अशी मागणी करणारा ठराव पाथरीत मंगळवारी (दि. 21) झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पाथरीचे शिष्टमंडळ बुधवारी किंवा गुरुवारी चर्चा करणार आहे.

साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असून, या क्षेत्राच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यानंतर शिर्डीकरांनी आक्रमक पवित्रा घेत रविवारी बंद पाळला होता. या बंदची दखल घेत सोमवारी मुख्यमंत्र्यांनी शिर्डीतील मान्यवरांना चर्चेला बोलाविले होते. पाथरीचा जन्मस्थळाऐवजी तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे शिर्डीचे आंदोलन मागे घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर पाथरीत मंगळवारी महाआरती आणि सभेचे आयोजन साईबाबा जन्मस्थान कृती समितीने केले होते.

साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाला होता. त्यामुळे साईबाबांचे जन्मस्थळ म्हणूनच पाथरीचा विकास करावा, असा असा ठराव या सभेत संमत झाला. यासंदर्भात पाथरीकरांचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले असून, ते दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. या सभेला खा. संजय जाधव, आ. सुरेश वरपुडकर, माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, राजेश विटेकर, मुंजाजी भाले,अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, सुभाषराव कोल्हे, विलास बाबर, रामभाऊ घाडगे,राम खराबे, सुरेश ढगे, मुंजा कोल्हे, रवींद्र धर्मे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना साईबाबा संस्थान कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्याकडे पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचे 29 पुरावे आहेत. नगरपालिकेच्या मूळ दस्तावेजांमध्ये साईबाबांच्या घरांची नोंद आहे. गॅझेटमध्येही साईबाबांचे पाथरी हे जन्मस्थान असल्यामुळे शिर्डीकरांनी सबुरीने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. खा.संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्याला संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळालेले नाही. जन्मभूमीसाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. साईबाबांचे वारस संजय भुसारी यांनी जन्मस्थळाबाबात सविस्तर विश्लेषण केले. या सभेत विकास निधी नाही मिळाला तरी चालेल पण साई जन्मभूमीला न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

बीडमध्येही होते साईबाबांचे वास्तव्य
बीड : उदय नागरगोजे
साईबाबांच्या जन्मभूमीवरील वादाचे पडसाद उमटत असताना आता बीडचे नावही पुढे आले आहे. साईबाबांनी काही काळ बीडमध्ये वास्तव्य करून जरीचे काम केल्याचे, याबद्दल त्यांना पोशाखाचे बक्षीस मिळाल्याचा उल्लेख  (कै.) गोविंदप्रसाद दाभोळकर लिखित ’श्री साई सच्चरित’ या ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे बीडसाठी भरघोस निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाथरी येथील भाविकांनी साईंच्या जन्मस्थानाबाबत दिलेल्या 27 पुराव्यांपैकी काही पुस्तकांमध्ये त्यांनी बीडमध्ये नोकरी केल्याचा उल्लेख आहे. यातीलच एक असलेल्या गोविंदप्रसाद दाभोळकर लिखित  श्री साई सच्चरित या ग्रंथातील 32 व्या अध्यायात ओवी क्र.151 ते ओवी क्र.158 दरम्यान बीडचा उल्लेख आहे.  यामध्ये 

‘एकंदा मी लहान असता । फडका बांधोन पोटाभोवती।धंदा मिळावा निर्वाहापुरता। आणूनि चित्ता निघालो ॥152॥ चालता चालता बीड गावा । आलो तेथे घेतला विसावा । फकिराचा माझ्या न्याराच कावा। आनंद जीवा वाटला ॥153॥ तिकडे मिळाले जरीचे काम। मीही खपलो अविश्रम ।  फळले ते माझे सकळ श्रम । पहा पराक्रम फकिराचा  ॥ 154 ॥ माझ्या आधीच लाविलेले । हुशार  हुशार नावाजलेले । चार पोरांही काम केले । तेही मापिलें ते समयी ॥ 155॥ एकाने पन्नास रुपयांचे केले । शंभराचे दुजियाचे झाले । तिजियाचे दीडशांचे भरले। माझे सर्वांहुनी द्विगुणित ॥156॥ पाहुनिया माझी हुशारी धनी बहु आनंदला अंतरी । बहुतांपरी मज गौरव करी । प्रेम भारी मजवरी ॥157॥ मज तयाने पोशाख दिधला । डोईस पागोटे, अंगावर शेला । परी मी तो बांधून ठेविला । जैसा दिधला तैसाच ॥158॥’

असा बीडमध्ये वास्तव्य असल्याचा, या दरम्यान केलेल्या कामाचा आणि त्यामुळे बक्षीस मिळाल्याचा, ते तसेच ठेवल्याचा उल्लेख या साई सच्चरित पुस्तकामध्ये आहे.  जन्मभूमी, कर्मभूमीवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद सगळीकडे उमटत असताना काही पुस्तकांमध्ये बीडचा उल्लेख आल्याने याची चर्चा होत आहे. गोविंदराव दाभोळकर लिखित ’श्री साई सच्चरित’ या ग्रंथात श्री साईबाबा बीड येथील पेठ बीड भागात काही दिवस जरीचे काम करत होते याचा उल्लेख आहे. हे तर मान्यच करावे लागेल, पण याचे भांडवल करण्याचा हेतू चुकीचा आहे, अशी भूमिका बीड येथील श्री साई सेवा परिवारच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच प्रतिवर्षी निघणारी बीड ते शिर्डी पालखी सुरू राहणार असल्याचेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

श्री साई सच्चरित या पुस्तकात साईबाबा स्वतःबद्दल सांगत असल्याच्या ओव्या आहेत. यामध्ये त्यांनी बीडमध्ये वास्तव्य असताना काम केल्याचा उल्लेख आहे. यावरून ते काही काळ बीडमध्ये थांंबले होते हे स्पष्ट होते. हे श्री साई सच्चरित पुस्तक 1930 मध्ये गोविंदप्रसाद दाभोळकर ऊर्फ  हेमाडपंत दाभोळकर यांनी लिहिलेले आहे. याची इंग्रजी आवृत्ती 1944 मध्ये प्रकाशित झाली.
डॉ. विद्यासागर पाटांगणकर, संत साहित्याचे अभ्यासक, बीड