Sun, Jul 12, 2020 17:43होमपेज › Marathwada › माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांना अटक

माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांना अटक

Published On: Oct 15 2018 12:45PM | Last Updated: Oct 15 2018 12:49PMपरभणी  :  प्रतिनिधी

येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील तब्बल १३५ कर्मचार्‍यांनी त्यांच्या स्वकष्टाने अर्जीत केलेल्या कमाईतून स्वतःची घरे बांधण्यासाठी खरेदी केलेली जमीन संस्थाध्यक्षाने तलाठी व इतरांना हाताशी धरून हडप केल्याचे प्रकरण नानलपेठ पोलिसांत दाखल आहे. या प्रकरणात तलाठयास पोलिसांनी शुक्रवारी अटक  केलेली असून, १५ऑक्टोबर रोजी सकाळी ११वाजता माजी खासदार अ‍ॅड.गणेशराव दुधगावकर यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी दिली आहे. 

परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयातील १३५ कर्मचार्‍यांनी एक नियोजीत गृहनिर्माण संस्था स्थापन केली. याकरिता सुंदरलाल सावजी जिंतूर अर्बन को.ऑप.बँकेकडून सर्वांनी कर्ज घेवून संस्थेच्या नावे पाथरी रोड येथे सर्वे नंबर ६१३ मधील १६ एकर ८गुंठे जमीन घरे बांधकामासाठी मुख्य प्रवर्तक नारायण माधवराव बुलंगे यांच्या नावे खरेदी केली. त्यानंतर माजी खासदार गणेशराव दुधगावकर व महसुल कर्मचार्‍यांनी मिळून ती जमीन महसूल दप्‍तरी बनावट व खोटे फेरफार नोंदवून माजी खासदार दुधगावकर यांच्या नावे केली. 

यात मुख्य भूमिका ही तलाठी दत्‍तात्रय श्रीरंगराव कदम यांनी बजावली होती. २०१२मध्ये एक बनावट फेरफार नोंदवून त्याआधारे नमुद सर्वे नंबर ६१३ मधील १६  एकर ८ गुंठे जमीन दुधगावकर यांनी स्वतः खरेदी केल्याचे दाखवले. याप्रकरणी ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्‍त प्राचार्य बी.एस.सोळुंके यांच्या तक्रारीवरून १६  डिसेंबर २०१७ रोजी नानलपेठ पोलिस ठाण्यात माजी खासदार गणेशराव दुधगावकर, तलाठी दत्‍तात्रय कदम, सेवानिवृत्‍त तलाठी रावसाहेब पाटील, निवृत्‍त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्‍त नायब तहसीलदार वि.गो.गायकवाड, निवृत्‍त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तलाठी कदम यांनी अटकपुर्व जामिनासाठी सत्र न्यायालय व नंतर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

 न्यायालयांनी अर्ज फेटाळल्याने पोलिसांनी त्यांना १२ ऑक्टोबर रोजी अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत तलाठी कदम यांना पोलिस कोठडी सुनावली होती.१५ ऑक्टोबरला याच गुन्ह्यात आरोपी अ‍ॅड.गणेशराव दुधगावकर यांना  अटक झाली असून त्यांना न्यायायलयासमोर हजर करण्यात येणार आहे.