Mon, Sep 21, 2020 12:27



होमपेज › Marathwada › हिंगोलीत बाधितांची संख्या त्रिशतकाकडे

हिंगोलीत बाधितांची संख्या त्रिशतकाकडे

Last Updated: Jul 04 2020 6:32PM

संग्रहित छायाचित्र



हिंगोली : पुढारी वृत्तसेवा   

हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्येची त्रिशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. शुक्रवारी  रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या असून शासकीय कार्यालयातून कर्मचार्‍यांचे अपडाऊन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपूर्वी आटोक्यात आली असताना पुन्हा जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे मोठ्या शहरातून आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ लागल्याचे चित्र आहे. मात्र महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या सतर्कतेने बाहेरगावाहून आलेल्या गावकर्‍यांना थेट विलगीकरण कक्षात पाठवले जात असल्याने सामाजिक संक्रमणाचा धोका काही प्रमाणात कमी झाला आहे.

शुक्रवारी तब्बल बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. यामध्ये हिंगोली शहरातून दोघांचा समावेश असून, हे दोघेही हैदराबाद येथून परत आले होते. तसेच कळमनुरी तालुक्यातील पाच जणांचा समावेश असून त्यात दोघेजण कळमनुरी येथील आहेत. ते औरंगाबाद येथून आले होते. तर तिघेजण कळमनुरी तालुक्यातील नवी चिखली या गावातील आहेत हे तिघेही मुंबई येथून आले आहेत.

वाचा : नांदेड : कोरोनामुळे श्रीदत्त नामाच्या जयघोषास माहूरकर मुकणार

याशिवाय वसमत येथील चौघांचा समावेश असून हे चौघेजण कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील होते. तर सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रूक येथील एका २५ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २८९ झाली आहे. त्यापैकी २४८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सद्या ४१ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

शहरातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये परभणी येथून ये-जा करणार्‍या एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तातडीने आदेश काढून जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचे अपडाऊन यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे.

वाचा : बीड : गावठी पिस्तूलासह दोघांना पकडले





 







"