होमपेज › Marathwada › दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत शरद पवार करणार दौरा

दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत शरद पवार करणार दौरा

Published On: Apr 29 2019 7:44PM | Last Updated: Apr 29 2019 7:44PM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर येणार आहेत. बुधवारी (दि. १) ते जिल्ह्याच्या विविध भागात भेटी देऊन दुष्काळग्रस्तांचे दु:ख जाणून घेणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने दौर्‍याची माहिती दिली आहे. 

राष्ट्रवादीने पत्रकात म्हटले आहे, की जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व रोजगाराचे प्रचंड हाल होत आहेत. खरिपातून अत्यल्प उत्पन्न मिळाले होते व रब्बीची तर बहुतांश ठिकाणी पेरणीच झाली नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. यातून अनेक शेतकऱ्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. या भीषण दुष्काळी परिस्थितीती पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या १ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सकाळी १०:३० वाजता घाटपिंपरी (ता. भूम), दुपारी १२ वाजता चोराखळी( ता. कळंब) व दुपारी २ वाजता बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथे भेट देवून पाहणी करणार आहेत. आपल्या अडी-अडचणी मांडण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. 

या दौऱ्यानंतर खा. पवार हे मुख्यमंत्र्याकडे अडचणी मांडून योग्य त्या उपाययोजना राबविण्याबाबत सुचित करणार आहेत.