होमपेज › Marathwada › बीड : पहिल्या पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीकडून दुसरीचाही खून?

बीड : पहिल्या पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीकडून दुसरीचाही खून?

Published On: Sep 07 2019 11:30AM | Last Updated: Sep 07 2019 12:22PM
बीड: प्रतिनिधी 

तालुक्यातील नेकनूरमध्ये कुर्‍हाडीचे घाव घालून एका चाळीस वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना नेकनूर मधील गणेश हॉटेलच्या पाठीमागील वस्तीमध्ये काल  (दि. 6 सप्टेंबर) रोजी संध्याकाळच्या वेळेला उघडकीस आली. दरम्यान, या प्रकरणी संशयित काळे नामक व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात आहे. 

नेकनूर मधील गणेश हॉटेलच्या पाठीमागे मकसूद नर्सरी रोडवरील वस्तीमध्ये  संध्याकाळच्या वेळी एका महिलेचा खून झाल्याची  घटना उघडकीस आली.  मृत महिलेचे नाव राणी आहे तर आरोपीचे नाव काळे ( पूर्ण नाव समजू शकलेले नाही ) असे आहे.  गेल्या सहा ते सात वर्षांपासून काळे व राणी हे पती-पत्नीच्या नात्यानेच राहत होते. खून केलेल्या आरोपीने त्याची पहिली पत्नी हिचा सात ते आठ वर्षापूर्वी खून केला होता. या खुनाच्या आरोपातून त्याची मुक्तता झाल्या पासून राणी त्याच्यासोबत राहत होती. 

परंतु कित्येक वेळा या दोघांमध्ये आणि आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होत होते.दोन महिन्यापूर्वी आरोपीने घरातल्यांना आणि मृत राणी यांना मारहाण केली होती. त्यामुळे घरातील सर्व सदस्य घर सोडून गेले आहेत. त्यानंतर राणी या आरोपीच्या घरी परत आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात आरोपीने या महिलेच्या डोक्यात, अंगावर कूर्‍हाडीने वार केले. त्यामुळे राणी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तब्येत खराब आहे असे कारण देत शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल झाला. त्यानंतर ही घटना गावांमध्ये माहीत झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला दवाखान्यामधून ताब्यात घेतले. 

काळे हा आरोपी गेल्या दोन महिन्यापासून नेकनूर मध्ये विक्षिप्तपणे वागत होता. या आरोपीच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रारीही दिलेल्या आहेत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

गेल्या सात ते आठ वर्षापूर्वी याच आरोपीने आपल्या पहिल्या पत्नीचा खून केला होता. त्यानंतर घरातील आई-वडील व तीन मुले असा परिवार उघड्यावर पडला होता. परंतु या आरोपीच्या भीतीपोटी घरातील वृद्ध आई-वडील व तीन मुले गाव सोडून गेले होते. त्यातच पुन्हा आणखी एकदा याच आरोपीने त्याच्यासोबत राहत असणारी राणी नावाच्या महिलेचा खून केल्याने पुन्हा हेच कुटुंब उघड्यावर आले आहे.