Fri, Dec 13, 2019 22:05होमपेज › Marathwada › नॉनव्हेज खाल्ल्याने ७० जणांना विषबाधा

नॉनव्हेज खाल्ल्याने ७० जणांना विषबाधा

Published On: Jun 12 2019 11:41AM | Last Updated: Jun 12 2019 1:23PM
बीड : प्रतिनिधी

कंदुरीच्या कार्यक्रमात मटण व इतर पदार्थ खाल्ल्याने जवळपास ५० ते ७० लोकांना विषबाधा झाली. हा प्रकार बीड शहरातील धानोरा रोड भागात मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. तर सर्वांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बीड शहरातील धानोरा रोड भागात जागरण गोंधळानिमित्त कंदुरीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री ठेवण्यात आला होता. रात्री उशीरा जेवणे सुरु झाली. ११ वाजण्याच्या सुमारास एकामागून एकास त्रास होऊ लागला. काहींना उलट्या तर काहींना मळमळ होऊ लागल्याने तात्काळ  संबंधित व्यक्तींना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ५० जणांना अॅडमिट करण्यात आले होते. त्यामध्ये १४ लहान मुलांचा समावेश आहे.

सदरील घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास देण्यात आली. सहाय्य आयुक्त कृष्णा दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे व इतर कर्मचारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सर्वाना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर कंदुरीसाठी बनविलेला मटणाचा रस्सा, भात, वांग्याची भाजी, बाजरीच्या भाकरीचे सॅम्पल घेण्यात आले. 

यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी सांगितले आहे की, नॉनव्हेज खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून सॅम्पल तपासणीसाठी घेतले आहेत. तर पंचनामा करण्यात येणार आहे. सोबतच जबाबही घेतले जाणार आहेत.