Fri, May 29, 2020 03:07होमपेज › Marathwada › राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Published On: Sep 18 2019 2:11PM | Last Updated: Sep 18 2019 3:20PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमधून पहिली यादी जाहीर केली.बीड : पुढारी ऑनलाईन 

आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  बीड जिल्ह्यातील पाच उमेदवार जाहीर केले आहेत. 

परळी विधानसभा मतदारसंघातून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके अशी पाच जणांची यादी जाहीर केली. आष्टी मतदारसंघातील उमेदवार नंतर जाहीर होणार आहे. 

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी बहीण-भावाची लढत झाली होती. यात पंकजा मुंडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भावाला पराभवाची धूळ चारली. पुन्हा एकदा परळीत असाच बहीण-भावाचा सामना रंगणार आहे. बहीण ग्रामविकास मंत्री, तर भाऊ विरोधी पक्षनेता असल्याने या हायव्होल्टेज लढतीकडे सार्‍या राज्याचे लक्ष असणार आहे.

सेनेकडून जयदत्त क्षीरसागर निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. याच जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मेटे हे महायुतीतील घटकपक्ष असल्याने त्यांना दोन-तीन जागा द्याव्या लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या हितसंबंधामुळे त्यांना बीडची जागा मिळाली तरी स्थानिक भाजपला हे मान्य होणार नाही. मंत्री पंकजा मुंडेदेखील त्यांची उमेदवारी मान्य करणार नाहीत. बीडमध्ये भाजप, सेना आणि शिवसंग्राममध्ये उमेदवारीवरून मोठा संघर्ष होणार आहे. गेवराईत आ. लक्ष्मण पवार भाजपचे विद्यमान आमदार आहेत.