होमपेज › Marathwada › परंड्यात मातब्बरांची लढत शक्य

परंड्यात मातब्बरांची लढत शक्य

Published On: Sep 26 2019 2:24AM | Last Updated: Sep 25 2019 9:22PM
परंडा : अशुतोष बनसोडे

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदार संघात 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटे यांनी विजय मिळवून शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील व रासपचे बाळासाहेब हाडोंग्रीकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. यावेळी परिस्थिती निराळी आहे. युवा मतदारांचा टक्का वाढल्याने आमदार ठरवण्याची जबाबदारी याच मतदारांची असेल. राष्ट्रवादीचे आ. राहुल मोटे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी तयारीही सुरू केली आहे. 

काँग्रेसकडून 2014 मध्ये अ‍ॅड. नुरोद्दीन चौधरी रिंगणात होते. काँग्रेस पक्षात मातब्बर मोठ्या संख्येत आहेत, मात्र शिवसेनेच्या इशार्‍यावर काम करून त्यांचे जनमत मोठ्या प्रमाणात घटले आहे. 

आ. मोटे यांनी केलेली विकास कामे, त्यांचा प्रत्येकाला सांभाळून घेणारा स्वभाव, तिन्ही तालुक्यांत असणारा जनसंपर्क त्यांना सर्वात फायद्याचा ठरणार आहे. या विधानसभेसाठी युती झाल्यास ही जागा शिवसेनेला जाणार, यात शंकाच नाही. शिवसेनेकडून जलसंधारण मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, धनंजय सावंत, सुरेश कांबळे, दत्ता साळुंके यांची नावे चर्चेत आहेत. ही जागा भाजपच्या पदरात पाडून घेण्यासाठी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे जोरदार प्रयत्न आहेत. ही जागा भाजपला सुटल्यास किंवा युती न झाल्यास भाजपकडून भूम नगर परिषदेचे गटनेते संजय गाढवे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ निश्चित पडू शकते. या लढाईत वंचित बहुजन आघाडीकडे दुर्लक्ष करणे धाडसाचे ठरेल. 

वंचितचा विचार करूनच इतर उमेदवारांना रणनीती ठरवावी लागेल. वंचितकडून पुणे येथील उद्योजक व नळी वडगावचे सुपुत्र प्रवीण रणबागुल यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिवसेना आणि भाजपच्या वादात ही जागा भाजपच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षला मिळेल, अशी आशा या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. या मातब्बरांसोबतच आणखी काही उमेदवार ऐनवेळी समोर येतील. निवडणुकीच्या तोंडावर डॉ. सावंत यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने विरोधक ताकही फुंकून प्यायला लागले आहेत. डॉ. सावंत यांना रोखणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा आहे.