दिलीप माने
लोकसभा निवडणुकीसाठी परभणी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश विटेकर या तरुण नेत्याला संधी दिली आहे. शिवसेना या मतदारसंघातून संजय (बंडू) जाधव यांना उमेदवारी देईल असे चित्र आहे. भाकपने राजन क्षीरसागर यांचे नाव निश्चित केले आहे. याशिवाय बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार रिंगणात राहील. त्यामुळे परभणीची लढत यंदा तिरंगी होण्याची शक्यता आहे.
मागील तीस वर्षांचे चित्र पाहता परभणी मतदारसंघ शिवसेनेच्याच ताब्यात राहिला आहे. भाजप व शिवसेनेची युती झाली असल्यामुळे या मतदारसंघात भाजप आपला उमेदवार उभा करणार नसल्याने सेनेची वाट काहीशी सुकर झाली आहे. शिवसेनेने अजून नावाची घोषणा केली नसली तरी विद्यमान खा. संजय जाधव हेच उमेदवार राहतील, यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
याशिवाय अपक्ष म्हणून माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना साकोरे-बोर्डीकर यांची जोरदार चर्चा होत आहे. पण त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का? या निवडणुकीतून आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करून घेत आहेत. असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विटेकर यांना उमेदवारी मिळाल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे म्हटले जाते. त्यांचा स्वभावगुण व त्यांची राजकारणाची पद्धत ही लोकांना खूप भावनिक करणारी ठरत आहे. त्यांना गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, जिंतूर या तालुक्यांतून बर्यापैकी मताधिक्य मिळू शकते. विटेकर यांच्याकडे पक्षातील नेत्यांचा मोठा फौजफाटा तयार झालेला आहे; तर सेनेचे विद्यमान खा. जाधव यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली आहे.
या दोघांमध्ये असलेला हा फरक या निवडणुकीत त्यांना कितपत लाभदायक ठरतो हे येणारा काळच ठरवणार आहे. यामध्ये परभणी, पूर्णा, पालम या तीन तालुक्यांतील मतदार कोणत्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. नव्याने निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडी पक्षाने आपला अधिकृत उमेदवार अजूनही जाहीर केला नाही. वंचित आघाडीचा उमेदवार कोण यावरही पुढील राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे.