Mon, Sep 28, 2020 13:51होमपेज › Marathwada › हळदीला तुटपुंजा भाव

हळदीला तुटपुंजा भाव

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 10:55PMहिंगोली : प्रतिनिधी

एकेकाळी हिंगोली जिल्हा कापसाचे माहेरघर म्हणून ओळखले जात असत. त्यात मागील काही वर्षांपासून हवामानाच्या बदलामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी कपाशीचे पीक कमी करून हळदीकडे वळल्याचे चित्र आहे. आजमितीस जिल्हाभरात 30 हजार हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली आहे. सध्या हळदीला केवळ आठ हजारांंच्या आत असा तुटपुंंजा भाव मिळत असल्याचे परिसरातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी आमदानी अठ्ठनी खर्चा रुपया अशी म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

यंदाच्या मृग नक्षत्रात दमदार पडलेल्या पावसावर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, हळद, ज्वारी, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. त्यानंतर अधूनमधून पडणार्‍या पावसाने पुन्हा शेतकर्‍यांना आभाळाकडे पाहण्यास भाग पाडले. परिणामी खरिपातील पिकांना पाणी कमी पडल्याने उत्पन्‍नात मोठी घट झाल्याचे दिसून आले. हिंगोली जिल्ह्यात गत काही वर्षांपूर्वी कपाशीचा मोठा उत्पादक शेतकरी वर्ग परिसरात होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे होत असलेल्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडत आला आहे. यात सर्वाधिक फटका यंदा कपाशीला बसल्याचे पाहावयास मिळेल. त्या पाठोपाठ पाण्याअभावी कमी उत्पन्‍न होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अलीकडच्या काळात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हळदी पिकाकडे जिल्ह्यातील शेतकरी वळल्याचे पाहावयास मिळत आहे. आजघडीला जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ आणि सेनगाव अशा पाचही तालुक्यांत हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्‍न घेतल्या जाते. गत दोन वर्षांचा विचार करता जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने हळदीची लागवड करताना दिसून येत आहेत. त्याप्रमाणे उत्पन्‍न तसे काही प्रमाणात चांगले आहे. मात्र गत वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे हळदीच्या उत्पन्‍नात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यात हळदीला केवळ 5 हजारांपासून ते आठ हजारांवर भाव मिळत असल्याने परिसरातील शेतकर्‍यांचा लावलेला खर्चही निघतो की नाही, असा प्रश्‍न आतापासूनच पडला आहे. त्यामुळे आमदानी अठ्ठनी खर्चा रुपया अशी म्हणण्याची वेळ परिसरातील शेतकर्‍यांवर आली आहे. असे चित्र राहिल्यास आगामी वर्षात हळदीचे उत्पन्‍न घेणारे याकडेही पाठ फिरवणार हे मात्र खरे. 

Tags : Marathwada, Insufficient, rate, Turmeric