Thu, Jul 09, 2020 22:34होमपेज › Marathwada › अर्भकाला फेकले मंदिराच्‍या तीर्थकुंडात  

अर्भकाला फेकले मंदिराच्‍या तीर्थकुंडात  

Published On: Sep 14 2019 12:44PM | Last Updated: Sep 14 2019 12:44PM

सोनारीतील प्रसिद्ध श्री काळभैरवनाथ मंदिराच्या लगत असलेल्या सोनूबाई तीर्थ कुंडात एका नवजात अर्भकाला फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. परंडा (उस्‍मानाबाद) : प्रतिनिधी

परंडा तालुक्‍यातील सोनारी येथे मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सोनारीतील प्रसिद्ध श्री काळभैरवनाथ मंदिराच्या लगत असलेल्या सोनूबाई तीर्थकुंडात एका नवजात अर्भकाला फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेव्हा सकाळी ८ च्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी परिसरात खळबळ उडाली.

सोनारी येथील श्री काळभैरव मंदिराच्या परिसरातील सोनूबाई तीर्थकुंडात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. या अर्भकाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

या घटनेची माहिती मिळताच, आंभी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शरद वाधुले, सोनारी बिट अंमलदार जी.एस.मुळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पंचनामा करून अर्भकाला ताब्यात घेतले. यावेळी मंदिराचे मुख्य पुजारी संजय महाराज, अशोक माने, अविनाश ईटकर, संतोष दुबळे, अक्षय हांगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात या अर्भकाचे शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे.

 राज्यात सध्या स्त्रीभ्रूण हत्या या प्रश्नी जोरदार जनजागृती सुरू असतानाच मंदिर परिसरात बेवारस अर्भक सापडल्याने नागरिकांमध्ये या प्रकरणी चर्चेला उधाण आले होते. तीन-चार दिवसांपूर्वी जन्म देऊन एखाद्या महिलेने हे अर्भक फेकून दिले असावे. तसेच प्रसूत झालेली महिला त्याच परिसरातील असावी, असा अंदाज पोलिसांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शवविच्छेदनावरून अर्भकचे डीएनएसाठी नमुने घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील गोष्टी सिध्द होतील, अनैतिक संबंधातून हे बालक जन्माला आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.