Sat, Jul 11, 2020 20:41होमपेज › Marathwada › जमिनीसाठी पतीकडून पत्नीचा खून

जमिनीसाठी पतीकडून पत्नीचा खून

Published On: Jul 11 2019 8:57PM | Last Updated: Jul 11 2019 8:56PM
किल्ले धारूर(जि, बीड) : प्रतिनिधी

अडीच एकर जमिनीच्या तुकड्यासाठी पतीने पत्नीचा विष पाजून खून केल्याची दुर्दैवी घटना कासारी (बो.)येथे  बुधवारी घडली. राहीबाई बालासाहेब बडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह अन्य एका जणावर दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, तेलगाव पासून जवळच असलेल्या कासारी (बो.ता.धारूर) येथील बालासाहेब व्यंकटी बडे आणि त्याची पत्नी राहीबाई बालासाहेब बडे या पती पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून लहानसहान कारणावरून सतत भांडणे होत होती. त्यातच बालासाहेब  बडे यांची अडीच एकर शेतजमीन पत्नी राहीबाई यांच्या नावावर आहे. ही जमीन आपल्या नावावर करावी यासाठी बालासाहेब हा पत्नीकडे तगादा लावत होता. याच जमिनीच्या कारणावरून या पती पत्नीत अनेक दिवसांपासून वाद चालू होता. त्यातून राहीबाई आपल्या माहेरी भोगलवाडी येथे भावाकडे राहतात व अधून मधून सासरी कासारी येथे जात असत. या पती पत्नीस एक मुलगा एक मुलगी आहे. राहीबाई या बुधवारी सासरी कासारी येथे आल्या असता त्यांचे व पतीचे अडीच एकर जमीन नावावर करण्याच्या कारणावरून भांडण झाले व या भांडणातूनच बालासाहेब बडे यांनी पत्नी राहीबाईस बुधवारी दुपारी विषारी औषध पाजले. राहीबाई यांना उपचार्थ अंबाजोगाई येथे शासकीय दवाखान्यात दाखल केले होते. परंतु उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. याप्रकरणी मयत राहीबाई यांचा भाऊ बिभिषण तिडके यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात पती बालासाहेब बडे, दीर शाहू व्यंकटी बडे यांच्या विरोधात कलम 302, 34 भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे व त्यांचे सहकारी करत आहेत.