Tue, Aug 11, 2020 21:15होमपेज › Marathwada › गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर होणार गर्दी 

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर होणार गर्दी 

Published On: Dec 11 2017 7:48PM | Last Updated: Dec 11 2017 7:48PM

बुकमार्क करा

परळी  : प्रतिनिधी

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी, त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्ते मोठय़ा संख्येने दाखल होणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यावेळी परिवारासह गडावर उपस्थित राहणार आहेत. 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले सामाजिक उपक्रमांचे सर्व कार्यक्रम रद्द करून शोकाकूल कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तशी विनंती ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री उमा भारती यांना केली होती.  कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तरी महाराष्ट्राच्या विविध भागातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणारे मुंडे भक्त यंदा देखील आपल्या लाडक्या नेत्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर  जमणार आहेत. 

वैद्यनाथ साखर कारखाना हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता, त्यांच्या पश्चात हा कारखाना त्यांच्या कष्टाचे व स्वप्नाचे प्रतिक म्हणून आमच्यासाठी हा जिवाभावाचा विषय आहे असे ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. शोकाकुल परिवार हा कारखान्याशी अनेक वर्षे संबधित असल्यामुळे तो आमचाही परिवार आहे, त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या घटनेने परिवारातील सदस्य गेल्याचे दुःख झाले आहे, अशा भावना व्यक्त करून ना. पंकजाताई मुंडे यांनी संपूर्ण कुटूंबीयांसह उद्या गडावर येणाऱ्या भक्तांसाठी सकाळी ११ वा. पासून  उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले आहे.