होमपेज › Marathwada › जालन्यात गुंडाची हत्या

जालन्यात गुंडाची हत्या

Published On: Jun 11 2019 1:21AM | Last Updated: Jun 11 2019 1:21AM
जालना : प्रतिनिधी 

लोहार मोहल्‍ला भागात नागरिकांनी उद्ध्वस्त केलेल्या आपल्या घराची पाहणी करण्यासाठी आलेला सोन्या ऊर्फ रोहित नारायण जाधव (17) याची रविवारी रात्री लोखंडी पाइप, काठ्यांनी मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. सोन्या हा कुख्यात गुन्हेगार तान्या जाधवचा भाऊ असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या लोहार मोहल्‍ला भागात कुख्यात गुन्हेगार नारायण जाधव व त्याचा  मुलगा तान्या जाधव यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले होते. गुरुवारी रात्री परिसरातीलच एका मुलाला चाकू लावून तान्या जाधव व त्याच्या वडिलांनी लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर संतप्त नागरिकांनी गुन्हेगार बापलेकाच्या घरावर हल्ला चढवीत ते पाडून टाकलेे. जमावाचा रौद्रावतार पाहून जाधव याच्या कुटुंबीयांनी तेथून पळ काढला होता. दरम्यान, तान्या जाधव याचा लहान भाऊ सोन्या ऊर्फ रोहित शनिवारी रात्री पडलेले घर पाहण्यासाठी जात असताना जमावाने त्याला लोहार मोहल्ल्याजवळील पुलावर गाठले आणि त्याच्यावर प्राणघातक हल्‍ला केला.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर सोन्या जाधव यास गंभीर अवस्थेत जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सकाळी शवविच्छेदनानंतर त्याच्या नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर सोन्याचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.