Sun, Sep 27, 2020 03:47होमपेज › Marathwada › आष्टीतून धस पुत्र बंडाच्या तयारीत

आष्टीतून धस पुत्र बंडाच्या तयारीत

Published On: Oct 03 2019 2:18PM | Last Updated: Oct 03 2019 1:57PM

अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना जयदत्‍त धसशिरूर : प्रतिनिधी 

आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेदवारी प्राप्त करण्यासाठी धस-धोंडे गटाकडून झालेली गटबाजी आगामी निवडणुकात बंडखोरीचे संकेत देत होती. याला अनुसरून धस पुत्र जयदत्त धस यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भाजप उमेदवार भीमराव धोंडे यांना बंडखोरीचे संकेत दिले आहेत. यासह माजलगाव येथील भाजपची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीच्या प्रतीक्षेत असलेले मोहनराव जगताप यांना समजूत घालण्यासाठी सुरेश धस यांना मध्यस्ती करावी लागली होती, परंतु स्वतःच्या मतदारसंघात पुत्र जयदत्त धस बंडाच्या तयारीत असल्याने आता सुरेश धस नेमकी काय भूमिका घेतात याबद्दल आष्टी विधानसभा मतदारसंघात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.

भाजपकडून भीमराव धोंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश धस गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. भाजपकडून उमेदवारीसाठी धस कुटुंबाला टाळल्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर कार्यकर्त्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. यावर सुरेश धस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

परंतु धस यांनी यातून सारवासारव करत पक्षश्रेष्ठी घेतील तोच निर्णय अंतिम असेल असे त्यांनी जाहीर केले होते. परंतु, गुरूवारी त्यांचे पुत्र जयदत्त धस यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपतंर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, भीमराव धोंडे यांना शह देण्यासाठीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगु लागली आहे.