'जीव धोक्यात घालणारे पोलिस, डॉक्टर्सचा सन्मान करा'

Last Updated: Mar 26 2020 1:43PM
Responsive image

अफवांना बळी पडू नका, अफवा पसरवणाऱ्याविरुद्ध कारवाई होणार


परळी वैजनाथ : प्रतिनिधी 

सर्वत्र लॉकडाऊन असताना जिल्ह्यात काही ठिकाणी पोलिस आणि नागरिकांमध्ये झालेल्या वादानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. पोलिस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान करा, नियमांचे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लॉकडाऊनमध्ये बाहेर पडलेल्या काही जणांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी तर नागरिकांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही प्रकार घडले. यावरून धनंजय मुंडे यांनी कोणीही कायदा हातात घेतल्याचे खपवून घेतले जाणार नाही, असा सूचक इशारा दिला आहे.

मुंडे यांनी याबाबत फेसबूकवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना काही विशेष अधिकार दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याच परिस्थितीत घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक खरेदी किंवा काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे असल्यास त्यासाठी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या ठरवून दिलेल्या वेळेत तेही कुटुंबातील एकच सदस्याने बाहेर यावे. घालून दिलेले नियम हे जनतेच्याच हितासाठी आहेत. त्या नियमांचे पालन केल्यास अशी वेळ येणारच नाही, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय अधिकारी, कर्मचारी हे सर्वजण अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून या संकटाशी सामना करण्यासाठी काम करत आहेत. त्यांचा मान सन्मान करावा, त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करावा, कायद्याबाबत आदर ठेवावा व शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करावे हे सर्वकाही जनतेच्या हिताचेच आहे, कोरोना विषाणूचा सामना घरात राहून व संसर्ग होण्यापासून रोखणे यातूनच केला जाऊ शकतो असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

अफवांना बळी पडू नका, अफवा पसरवणाऱ्याविरुद्ध कारवाई होणार

दरम्यान, जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या भीतीसह सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहेत. कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता कोणतीही अनधिकृत माहिती पसरवू नये, असे सरकारकडून वारंवार सूचित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातही अफवांचे सत्र सुरू आहे. यावरून जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अफवांना बळी पडू नये, तसेच अनधिकृत माहिती शेअर करू नये, असे आवाहन केले आहे. जिल्हा पोलिसांच्या सायबर सेलला याबाबत सूचित केले असून अफवा पसरवून परिस्थिती बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी असेही मुंडे यांनी म्हटले आहे.