Wed, Aug 12, 2020 20:57होमपेज › Marathwada › अंबाजोगाई : पोलिसांची नजर चुकवून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ४ जणांविरूद्ध गुन्हा

अंबाजोगाई : पोलिसांची नजर चुकवून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ४ जणांविरूद्ध गुन्हा

Last Updated: Mar 26 2020 9:33AM
पुण्याहून गंगाखेडला प्रवासी घेऊन निघालेल्या टेम्पोतील चार जणांविरूद्ध गुन्हे 

अंबाजोगाई : प्रतिनिधी 

पुण्याहून गंगाखेडला प्रवासी घेऊन निघालेल्या टेम्पोतील चार जणांविरूद्ध अंबाजोगाई पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई शहरातील संत भगवानबाबा चौकात बुधवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गस्त सुरू असताना करण्यात आली. 

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संजय भगवान गित्ते वय (३४) , बिभिषण मधुकर गुट्टे (२२), सदाशिव मधुकर गुट्टे (२६), सूर्यकांत भगवान गित्ते (३२) सर्व राहणार माथरवाडी, राणीसावरगाव ता. पालम जि. परभणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलली आहेत. देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकून आडवळणाने नागरिक प्रवास करत असल्याचे या घटनेवरून उघडकीस आले आहे. पुण्याहून निघालेला हा टेम्पो अंबाजोगाईपर्यंत पोलिसांची नजर चुकवून आलाच कसा? हा प्रश्न पडला आहे. 

अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौकात पोलिसांच्या दृष्टीस टेम्पो पडला. तत्काळ त्यास थांबवून चौकशी  केली असता टेम्पोमध्ये वीसहून अधिक व्यक्ती प्रवास करत असताना आढळून आले. दरम्यान टेम्पो चालकाने आणि आतील प्रवाशांनी पोलिसांनाच उद्धटपणे उत्तरे दिली. याप्रकरणी पोलिस नाईक सुधाकर सांगळे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याने आणि एकत्र बसून प्रवास करून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार जणांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.