Wed, Sep 23, 2020 22:19होमपेज › Marathwada › काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीचे आव्हान

काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीचे आव्हान

Published On: Mar 03 2019 12:49AM | Last Updated: Mar 02 2019 8:46PM
गजानन लोंढे

हिंगोली लोकसभा मतदारसंघात आघाडीकडून विद्यमान खासदार राजीव सातव यांची उमेदवारी निश्‍चित आहे. सातव यांच्या विरोधात युतीचा उमेदवार कोण असेल याबाबत अंदाज वर्तविणे कठीण आहे.  वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीत उतरणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव यांनी शिवसेनेचे सुभाष वानखेेडे यांना अवघ्या 1632 मतांनी पराभूत केले होते. हिंगोलीचा मागील चाळीस वर्षांचा इतिहास पाहता शिवसेनेबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदारांनी समान संधी दिली. 1977 च्या जनता लाटेत जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. त्यानंतरच्या 1980, 84, 89 या तिन्ही निवडणुकींत काँग्रेसचे उत्तमराव राठोड विजयी झाले. 1991 ला शिवसेनेचे विलास गुंडेवार यांनी बाजी मारली, पण नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. 1996 च्या निवडणुकीत शिवसेनेचे शिवाजी माने, 1998 ला काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील, 1999 ला पुन्हा शिवाजी माने विजयी झाले. 2004 च्या निवडणुकीत सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढल्या आणि विजयी झाल्या.

2009 मध्ये मात्र शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीकडून मतदारसंघ आपल्याकडे खेचला. मतदारसंघ कोणाकडे याबाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याने शिवसेनेकडून वसमतचे आमदार जयप्रकाश मुुंदडा, उमरखेडचे माजी आ. प्रकाश पाटील देवसरकर, परभणीचे आमदार राहुल पाटील, नांदेडचे आ. हेमंत पाटील यांचीही चर्चा आहे. दुसरीकडे भाजपकडून मात्र तगड्या इच्छुकांची गर्दी असल्याचे दिसून येते. तीन माजी खासदार भाजपकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये सूर्यकांता पाटील, अ‍ॅड. शिवाजी माने, सुभाष वानखेडे यांचा समावेश आहे. याशिवाय अ‍ॅड. शिवाजी जाधव, श्याम भारती यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

हिंगोली लोकसभा मतदारसंघाची रचनाही विचित्र आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, नांदेडमधील किनवट, हदगाव या तीन मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. याशिवाय वसमत, हिंगोली, कळमनुरी हे हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ या क्षेत्रात येतात. सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर, दोन मतदारसंघ शिवसेनेच्या, दोन भाजपच्या, एक काँग्रेस व एक राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने युतीचे पारडे जड असल्याचे दिसून येते. विद्यमान खा. राजीव सातव यांची उमेदवारी एकीकडे निश्‍चित मानली जात असली तरी अधूनमधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याच्या वावड्या उठत आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांच्याकडे जबाबदारी सोपविली होती.

गुजरातेत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याने सातव यांचे केंद्रीय पातळीवर वजन वाढले आहे. राहुल गांधी यांच्या निकटच्या सल्लागारांपैकी ते एक आहेत. असे असले तरी गेल्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य फारसे लक्षणीय नव्हते. या पाच वर्षांत राजकीय चित्रही बदलले आहे. काँग्रेसमधील गटबाजी वाढलेली दिसते. गटबाजी दूर करण्याचे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या सर्व गटांना सोबत घेऊन आघाडीची मोट काँग्रेसला बांधावी लागणार आहे. किनवटमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असून, वसमतला या पक्षाचा मोठा प्रभाव आहे. याशिवाय सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादीत असताना त्या घड्याळावरच निवडून गेल्या होत्या, हे लक्षात घेण्यासारखे आहे. याशिवाय बहुजन वंचित आघाडी, माकप, आप, बसप हे काही पक्ष निवडणुकीत उतरतील. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी संयुक्त प्रचार केल्यास त्याचा मोठा परिणाम या भागात जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.